काँग्रेसची पुनर्रचना !

काही ठराविक लोकांच्या दावणीला बांधून काँग्रेसने स्वतःला डबक्यातला पक्ष करण्यापेक्षा ज्या पद्धतीने आता इंडिया गटातील पक्षांसोबत हातमिळवणी करून भाजपशी दोन हात केले, तशाच प्रकारे विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची तयारी करायला हवी.

Story: संपादकीय |
09th May, 12:16 am
काँग्रेसची पुनर्रचना !

गोव्यात लोकसभा निवडणुकीतले मतदान ७६ टक्क्यांच्या पुढे गेले. अजूनही काही मतदान त्यात जोडायचे असल्यामुळे ही आकडेवारी बदलू शकते. भाजपने उत्तर गोव्यात एक लाख आणि दक्षिण गोव्यात ६० हजार मतांच्या आघाडीचा दावा केला तर काँग्रेसने काही भागात वाढलेले मतदान हे भाजपच्या विरोधात असल्याचे म्हणत आपलेच उमेदवार जिंकतील, असा पुनरुच्चार केला. तिसऱ्या टप्प्यात देशात ९३ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले आणि देशात ६४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. शेवटचे सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होईल. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी होईल. त्याच दिवशी देशात पुन्हा कोणाची सत्ता असेल, त्याचेही चित्र स्पष्ट होणार.

भाजप विरोधी सर्व विरोधी पक्षांनी 'इंडिया' गटाची स्थापना केली. सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास आणि चारशे जागा मिळाल्यास भाजप देशाचे संविधान बदलू शकतो, असा दावा काँग्रेस करत आहे. तर तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असताना ओबीसींचा कोटा लुटत असलेल्या काँग्रेसला रोखण्यासाठी आपल्याला ४०० जागा द्या, अशी मागणी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांकडे करत आहेत. जनता नेमके कोणाला स्वीकारेल, हेही ४ जूनलाच दुपारपर्यंत स्पष्ट होईल. पण ७ मेच्या मतदानानंतर गोव्यातील चित्र काय असेल, त्याचा अंदाज राजकीय पक्षांना आणि मतदारांनाही आला आहे. त्याची दोन कारणे आहेत. एक, २०१९ च्या तुनलेत यावेळी उत्तर व दक्षिण गोव्यातील काही मतदारसंघांतील वाढलेली मतदानाची टक्केवारी. दुसरे कारण, मतदानादिवशी सर्वांनी पाहिलेले काँग्रेस अर्थात इंडिया गटाचे ढिसाळ नियोजन. नियोजन कसे करावे, मतदान केंद्रांपर्यंत मतदारांना कसे आणावे, हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. त्यांची दिवसभर जी धावपळ सुरू होती, ती मोठा लाभ भाजपला मिळवून देऊ शकते. काँग्रेस आपल्या प्रचारातही कमी पडली आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यातही. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळीच नसल्यामुळे पोषक वातावरण असतानाही काँग्रेसने संधीचा फायदा उठवण्यात रस दाखवलेला नाही. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यात काँग्रेस उपयशी ठरली. इंडिया गटात असलेल्या पक्षांचाही काही विशेष फायदा काँग्रेसला होईल असे दिसत नाही. उत्तर गोव्यात इंडिया गटातील इतर घटक पक्षांकडे आमदारही नाहीत. एकच आमदार आहे, तो काँग्रेसकडे. रमाकांत खलप यांच्या लोकप्रियतेमुळे म्हापसा, मांद्रे, कळंगुट, हळदोणा, पणजी, ताळगाव, सांताक्रुझ अशा मतदारसंघांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात. या मतदारसंघातील नुकसान भरपाई भाजप डिचोली, मये, साखळी, प्रियोळ, पर्ये, वाळपई, पेडणे यासारख्या मतदारसंघांतून भरून काढू शकते. 

दक्षिण गोव्यात सासष्टीतील आठ मतदारसंघांमध्ये जिथे एरवी काँग्रेसला मतांची मोठी आघाडी मिळते, तिथे मतदानाची किंचित टक्केवारी वाढली आहे. सासष्टीत आता भाजपनेही शिरकाव केल्यामुळे इथल्या मतदानाचा पूर्णपणे काँग्रेसलाच लाभ होईल, असे म्हणता येणार नाही. भाजपच्या मतांमध्ये तिथे वाढ होईल. मडगाव, नावेली, नुवे हे मतदारसंघ सध्या भाजपजवळ आहेत. शिवाय कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड भाजपसोबत आहेत. फातोर्डात भाजपसाठी नेहमीच चांगले मतदान होत असते. त्यामुळे सासष्टीतल्या या पाच मतदारसंघांचा फायदा उठवण्याचे प्रयत्न भाजपने निश्चितच केले असतील. काणकोण, सांगे, सावर्डे, फोंडा, शिरोडा, कुडचडे या मतदारसंघांमध्ये भाजपने आपली पूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. मडकईत सुदिन ढवळीकर यांनी भाजपला आघाडी देण्याचे आश्वासन दिले आहे. मुरगाव तालुक्यात दाबोळी, वास्को, मुरगाव मतदारसंघांतही भाजपलाच २०१९ च्या निवडणुकीत मतांची आघाडी मिळाली होती. यावेळी दाबोळी आणि कुठ्ठाळीत काँग्रेसच्या उमेदवाराला जास्त मते मिळू शकतील. उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात काँग्रेसची स्थिती काहीसी चांगली आहे. तिथे काही भागांत कार्यकर्ते आहेत. विधानसभेच्या सावर्डे, फोंडा, शिरोडा, मडकई, सांगे सारख्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे भाजपला टक्कर देण्यासारखी ताकद नाही. त्यामुळे एकूणच गोव्यात काँग्रेसला आता खरी गरज आहे, ती पुनर्रचनेची. वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये तोडीस तोड नेते शोधून त्यांना २०२७ पर्यंत निवडणुकीसाठी तयार करण्याची जबाबदारी काँग्रेसने उचलावी लागेल. असे नेते शोधावे लागतील, जे सध्याच्या काँग्रेस विरोधी आमदारांच्या तोडीचे ठरतील. काही ठराविक लोकांच्या दावणीला बांधून काँग्रेसने स्वतःला डबक्यातला पक्ष करण्यापेक्षा ज्या पद्धतीने आता इंडिया गटातील पक्षांसोबत हातमिळवणी करून भाजपशी दोन हात केले, तशाच प्रकारे विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची तयारी करायला हवी. प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात कार्यकर्त्यांची छोटी मोठी फौज तयार करावी लागेल. जी सध्या फक्त भाजपकडे आहे. कार्यकर्त्यांच्याच बळावरच भाजप दोन्ही जागांबाबत सध्या निश्चिंत आहे.