चर्चबाबतचे काब्रालांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज

Story: अंतरंग |
09th May, 12:14 am
चर्चबाबतचे काब्रालांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज

माजी मंत्री नीलेश काब्राल यांनी काही चर्चमधून भाजपला मतदान केले जाऊ नये अशा थेट सूचना मतदारांना करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांसमोर येत सांगितले. अशाप्रकारे धार्मिक संस्थांतून प्रचार होत असल्यास यातून खऱ्या अर्थाने लोकशाहीला मार बसू शकतो, असेही काब्राल म्हणाले व ते खरेही आहे. त्यामुळे काब्राल यांच्याकडून आवश्यक पुरावे घेत राज्यातील सरकारने गांभीर्याने विचार करून पुढील निर्णय घेण्याची गरज आहे.

लोकशाहीत सर्वधर्मीय लोकांना कोणत्याही भेदभावाशिवाय मतदानाचा व आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने सर्व धर्मांच्या लोकांना आपापल्या धर्मानुसार आचरण व पालन करण्याची पूर्ण मुभा घटनेने दिलेली आहे. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी सर्वांनी केल्या पाहिजेत, आपल्या हक्कांसाठी लढत असतानाच प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्येही त्याच पोटतिडकीने पाळण्याची गरज असते. गोव्यात सर्वधर्मीय एकत्र नांदतात. कोणत्याही व्देषभावाविना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील लोक एकमेकांच्या सण, उत्सवांना हजेरी लावतात. सर्वधर्मीयांच्या सणांना तोच उत्साह व बंधुता दिसणाऱ्या गोव्यातील वातावरण काही कारणास्तव गढूळ होऊ नये यासाठी राज्य सरकारनेही आवश्यक ती पावले व योग्यवेळी त्या चुकीच्या गोष्टींवर कारवाई करण्याची गरज आहे.

लोकशाहीचा मतदान उत्सव दोन दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी रोज कडक उन्हाबाबत बोलणाऱ्या मतदारांनी उन्हाच्या तापालाही न जुमानता घराबाहेर पडून उत्साहाने मतदान केल्याचे दिसते. याच धामधुमीत मतदान सुरू झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री तथा आमदार नीलेश काब्राल यांनी काही चर्चमधून प्रार्थना झाल्यानंतर संदेश देताना भाजपला मतदान करू नये, असा थेट संदेश लोकांना देण्यात आल्याचा आरोप केला. काब्राल म्हणाले की, आपल्या कुडचडे मतदारसंघात साधारणत: २८,२१३ मतदार आहेत. त्यातील साडेदहा ते अकरा हजार मतदार हे अल्पसंख्याक समाजाचे आहेत. चर्चमधून मतांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. चर्चमधून लोकांना आवाहन करताना मतदान करावे, मतदान करताना चांगल्या व्यक्तीला मतदान करा असे सांगणे हे समजू शकतो. पण थेट भाजपला मतदान करू नका असे सांगण्यात आलेले आहे. हे कुठेतरी वाईट दिसते. यासंदर्भात काही व्हिडिओही आपणाकडे आहेत. मतदानासाठी धर्माचा वापर केला जाऊ नये असे असतानाही हे असे प्रकार होतात याचे वाईट वाटते. चर्चमधून भाजपला मतदान करू नये असे भाषणात सांगण्यात आल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, सध्या ते कुणाला दिलेले नाहीत. पण वेळ पडल्यास ते सर्वाना दिले जातील. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कुणीही त्या व्यक्तीचा जात धर्म पाहत नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले जाते. मणिपूरचा विषय हा दोन जमातींमधील वादाचा आहे तो विषय गोव्यात काढून त्याआधारे मतांचे ध्रुवीकरण होणे हे चुकीचे वाटते, असे मत काब्राल यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारण्यांनी मांडले.

जातीधर्माच्या नावाने कुणीही मते मागू शकत नाही, एखाद्या ठराविक पक्षाला मतदान करायचे की नाही हे मतदाराने ठरवायचे असते, त्यावर मतदान करण्यासाठी दबाव आणण्याचाच हा प्रकार आहे. एखाद्या धार्मिक स्थळावरून थेट भाजपला मतदान केले जाऊ नये असे सांगण्यात येणे, हे गंभीर आहे. यापूर्वीही विधानसभा निवडणुकीवेळी अशाप्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. संविधानात बदलाचा विषयही विरोधकांनी लावून धरलेला असताना मतदारांच्या मतदानाच्या हक्कावर वार होणाऱ्या या घटना आहेत. हे प्रकार वारंवार होत असल्याने इतर धार्मिक स्थळांकडूनही असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे वेळीच या प्रकारांवर रोख येणे व योग्य ती कारवाई करण्यासाठी सरकारने ही वक्तव्ये गांभीर्याने घेण्याची गरज आहे. लोकशाहीच्या भल्यासाठी योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे.


अजय लाड, 

(लेखक दै. गोवन वाार्तचे दक्षिण गोवा ब्युरोचिफ  आहेत.)