पणजीत दोन तासांत सुमारे पावणे चार इंच पाऊस; अवकाळी पावसात बुडली स्मार्ट सिटी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th April, 02:48 pm
पणजीत दोन तासांत सुमारे पावणे चार इंच पाऊस; अवकाळी पावसात बुडली स्मार्ट सिटी

पणजी : स्मार्ट सिटी पणजीत आज सकाळी १० ते दुपारी १२ या दोन तासांत तब्बल ३.६९ इंच अवकाळी पावसाची नोंद झाली. या पावसात स्मार्ट सिटी पुन्हा बुडली. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. १८ जून रस्त्यावरील दुकानांत पाणी शिरले. तर ठिकठिकाणी झाडे आणि विजेचे खांब पडून किरकोळ नुकसान झाले. काही ठिकाणी रस्ते खचून वाहनांची चाके रुतून बसण्याचे प्रकार घडले.


पणजीमध्ये पहाटेपासूनच आकाशात काळेकुट्ट ढग जमले होते. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान पावसाचा जोर कमी झाला. दोन तासांच्या पावसात पणजीतील दयानंद बांदोडकर रस्ता, मिरामार परिसर, १८ जून रस्ता, भाटले, टोंका भागातील काही परिसर, कदंब बसस्थानक परिसर जलमय झाले. स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेला परिसर चिखलमय झाला. प्रशासनाने ‘बॉम्बे बाझार’ परिसरातील रस्ता काही काळ बंद केला होता. पावसामुळे अनेक रस्त्यांवर रहदारी संथगतीने सुरू होती.


महापौर रोहित मोन्सेरात यांनी सकाळी पणजीत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहरात पाणी साचल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी लगेच रस्त्यावर उतरले होते. मात्र स्मार्ट सिटीचे अधिकारी कुठेच दिसले नाहीत. आम्ही आधीच ड्रेनेज साफ केले होते. मात्र स्मार्ट सिटीच्या कामांची धूळ आणि माती पुन्हा ड्रेनेजमध्ये साठल्याने पाणी तुंबले. त्यांनी रस्ते बांधले मात्र ड्रेनेजचे काम अजूनही केलेले नाही. याबाबत आम्ही सोमवारी मुख्य सचिवांना बैठक घेण्यास विनंती केली आहे. स्मार्ट सिटीने ड्रेनेजचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, असे ते यावेळी म्हणाले.


दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी पणजीत साचेलेल्या पाण्यावरून भाजपवर निशाणा साधला. सरकारने स्मार्ट सिटीची कामे कशी आहेत, हे गोव्यातील सर्व जनतेला दाखवावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे. राज्यातील सर्व भागांतील लोकांना पणजीत आणून भाजपच्या विकासाचा महापूर कसा असतो, तेही दाखवावे, असे ते म्हणाले. तर विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी आज पणजीत १ हजार कोटी रुपये खर्चून केलेल्या विकासाचा ट्रेलर पाहायला मिळाल्याची टीका केली.

मुसळधार पावसामुळे पणजीतील बहुतांश रस्ते पाण्याखाली...  आणखी फोटो पहाण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा