राज्यात साडेतीन महिन्यांत ९२ अपघात, ९७ मृत्यू

एप्रिलमध्ये १४ दिवसांत १७ जण मृत्युमुखी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th April, 11:50 pm
राज्यात साडेतीन महिन्यांत ९२ अपघात, ९७ मृत्यू

पणजी : राज्यात अपघातांत होणाऱ्या मृत्यूंची मालिका सुरूच असून १ जानेवारी ते १४ एप्रिल २०२४ या १०५ दिवसांत ८४९ अपघात झाले आहेत. त्यांतील ९२ भीषण अपघातांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सरासरी दिवसाला ८ अपघात, तर २६ तासांत एकाचा अपघाती मृत्यू होत आहे. अपघात रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
अपघात रोखण्यासाठी लक्षावधी रुपये खर्चून रस्ता सुरक्षा सप्ताहात जागृती करणे, बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करणे आदी उपाययोजना वाहतूक खात्याकडून केल्या जात आहेत. तरीदेखील दिवसेंदिवस अपघात वाढत चालल्याचे दिसत आहे. मागील १४ दिवसांत १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात दुचाकीचालक आणि दुचाकीवर मागे बसल्यांची संख्या जास्त आहे. मागील वर्षी एप्रिलच्या १४ दिवसांत ८७ अपघात झाले होते. त्यांतील ५ भीषण अपघातांत ५ जणांना जीव गमवावा लागला होता. यंदा या काळात अपघाती मृत्यूंत तिपटीने वाढ झाली आहे.
राज्यात मागील १०५ दिवसांत १३० जण गंभीर जखमी झाले आहेत. २७६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. केवळ तालांव देऊन आणि प्रबोधन करून काही चालकांच्या बेशिस्त वागणुकीत फरक पडणार नाही. अपघातप्रवण क्षेत्र नष्ट करणे, रस्ते सुरक्षित करणे यांसह बेशिस्त चालकांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे.

हेही वाचा