बेळगाव : कर्नाटकातील बेळगाव येथून पोलिसांनी एका तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली आहे. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत या व्यक्तीने बेरोजगार तरुणांना टार्गेट करून त्यांना नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवले व लाखोंची फसवणूक केली असे आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
दरम्यान बेळगावच्या मालमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीतून हे प्रकरण समोर आले आहे. बेळगावच्या ऑटो नगर येथील एका व्यक्तीने या तोतया सीबीआयच्या विरोधात मालमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. आरोपी दयानंद हा सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक करत असल्याचे त्यात म्हटले होते. यानंतर पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत, सापळा रचून हुक्केरी तालुक्यातील इस्लामपुरा गावात राहणाऱ्या दयानंद जिद्राळे (३४) यास अटक केली.
आरोपी स्वत:ला सीबीआय अधिकारी सांगून बेरोजगार तरुणांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. वनविभाग, उत्पादन शुल्क विभागासह अनेक विभागात नोकरीचे आमिष दाखवून त्याने आतापर्यंत बऱ्याच लोकांची फसवणूक केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी रायबाग, कागवाड, चिक्कोडी परिसरात अनेकांची फसवणूक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध मालमारुती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. यासोबतच आरोपीने फसवणूक करून जमवलेल्या रकमेची माहिती गोळा करत पुढील कारवाई देखील सुरू केली आहे.
त्याच्यासोबत अन्य कुणी या प्रकरणात गुंतला आहे का ? या अनुषंगाने देखील शोध घेतला जात आहे. याशिवाय त्याने आत्तापर्यंत किती जणांना गंडा घातला आणि कोणते आमिष दाखवले याचाही सखोल तपास केला जात असल्याची माहिती माध्यमांना पोलिसांद्वारे देण्यात आली आहे.