रुमडामळ पंचायतीतील प्रकार : सरपंचांकडून पोलिसांत तक्रार
मडगाव : वारंवार सांगूनही पंचायत क्षेत्रातील कचर्याची उचल केली जात नसल्याने संतप्त झालेल्या पंच विनायक वळवईकर यांनी रुमडामळ सरपंचांच्या केबिनमध्ये कचरा आणून टाकत निषेध नोंदवला. याप्रकरणी सरपंच मुबिना फनीबंध यांनी मायना कुडतरी पोलिसांत तक्रार नोंद केली आहे.
रुमडामळ दवर्ली पंचायत क्षेत्रातील कचरा दररोज उचलला जात नाही. नागरिकांकडून वारंवार कचरा उचलण्यासाठी फोन येत असल्याने त्यांना कारणे दिली जातात. मात्र, पंचायतीकडून या संदर्भात कोणतीही दखल घेतली जात नाही. या प्रकारामुळे संतप्त रुमडामळ पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर यांनी सरपंचांच्या केबिनमध्ये कचरा टाकून निषेध नोंदवला. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
सरपंचांच्या केबिनमध्ये कचरा टाकण्यात आल्यानंतर पंच वळवईकर यांनी सांगितले की, पंचायत क्षेत्रात कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. यापूर्वी रुमडामळ पंचायत क्षेत्रातील पाचवर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू होण्याची घटना घडली. तरीही पंचायतीकडून कचरा उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. याआधी १० ते १२ कर्मचाऱ्यांकडून कचरा उचल केली जात असे. आता दोन किंवा तीन कर्मचारी दिसतात. सरपंच फनीबंद यांना विचारणा केली असता, कचरा उचल केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. ठेकेदाराकडून योग्य प्रकारे काम होत नसल्यास ठेकेदार बदलण्यासही सांगण्यात आले होते. वैयक्तिक स्वार्थासाठी काहीजणांकडून कचरा उचल न करणार्यांना पाठिशी घालण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, पंच सैमुल्ला फनीबंध यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी मायना कुडतरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले.