पावसाचा जोर ओसरला; पडझड कायम

पावसाचे प्रमाण ५७.५ टक्क्यांनी अधिक


25th July 2024, 12:22 am
पावसाचा जोर ओसरला; पडझड कायम

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. असे असले तरी पडझडीच्या घटनांची नोंद झाली. राज्यात १ जून ते २४ जुलै दरम्यान सरासरी १०७.६० इंच पावसाची नोंद झाली. यंदा पावसाचे प्रमाण ५७.५ टक्क्यांनी अधिक आहे. हवामान खात्याने राज्यात २५ आणि २६ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. २७ आणि २८ जुलै रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
राज्यात २४ तासांत सरासरी २.५६ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान वाळपई येथे सर्वाधिक ५.८७ इंच पाऊस झाला. केपेत ५.७८ इंच, सांगेमध्ये ४.५७ इंच, तर साखळीत ३.२४ इंच पावसाची नोंद झाली. बुधवारी पणजीत कमाल २९ अंश, तर किमान २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव येथील कमाल तापमान २८.८ अंश, तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस राहिले. पुढील पाच दिवसांत कमाल तापमान २९ ते ३० अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
राज्यात १ जून ते २४ जुलै दरम्यान वाळपई येथे सर्वाधिक १२७.६८ इंच पावसाची नोंद झाली आहे. यानंतर सांगे येथे १२३.२४ इंच, साखळीत ११९.४३ इंच, फोंडा येथे ११२.५१ इंच, केपेत ११०.२१ इंच, काणकोण येथे १०८.२६ इंच, पेडण्यात १०८.१५ इंच, जुने गोवेत १०५.९५ इंच, तर पणजीत १०४.४२ इंच पावसाची नोंद झाली.