मुस्लिमवाडा डिचोलीतील रोलिंग मिलमध्ये स्फोट

लोखंड वितळवण्याच्या भट्टीतील घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th May, 11:34 pm
मुस्लिमवाडा डिचोलीतील रोलिंग मिलमध्ये स्फोट

डिचोली : मुस्लिमवाडा डिचोली येथील कैराव रोलिंग मिल्सच्या आस्थापनात लोखंड वितळवणाऱ्या भट्टीत सलग चार ते पाच स्फोट झाल्याने सुमारे अर्धा किलोमीटरच्या परिसरातील घरांना हादरे बसले. डिचोली अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

लोखंड वितळवण्याच्या भट्टीत हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी रोलिंग मिलमधील भट्टीत एका मागोमाग एक असे चार ते पाच स्फोट झाल्याने अनेक घरांना हादरे बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करून झालेल्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. प्राथमिक चौकशीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र डिचोली पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र या संदर्भात अधिक माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिलेली नाही. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या प्रकरणी कसून तपास करण्यात येणार असल्याचे आश्वासन स्थानिकांना दिले.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेत अशाच प्रकारे स्फोट झाल्याने या ठिकाणी सर्व खबरदारी व उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर फॅक्टरीच्या सभोवताली पत्र्याचे आच्छादन तसेच फॅक्टरीच्या वरही आच्छादन घालण्यात आल्याने यावेळी मोठी हानी टळली आहे.

हेही वाचा