अखेर जागतिक बाजारपेठेतून कंपनीने ‘कोविशील्ड लस’ घेतली मागे; ‘असे’ दिले कारण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th May, 10:39 am
अखेर जागतिक बाजारपेठेतून कंपनीने ‘कोविशील्ड लस’ घेतली मागे; ‘असे’ दिले कारण

लंडन : ‘कोविशील्ड लस’ आरोग्यासाठी हानिकारक ठरत असल्याच्या आरोपांचा सामना करत असलेल्या ब्रिटनच्या AstraZeneca या दिग्गज फार्मा कंपनीने जगभरातून सर्व करोना लसी बाजारातून मागे घेतल्या आहेत. यामध्ये भारतात बनवलेल्या कोविशील्ड लसीचाही समावेश आहे. काही व्यावसायिक कारणांमुळे ही लस बाजारातून हटवण्यात येत आहे, असा खुलासा कंपनीने केला आहे.

‘टेलिग्राफ’ या ब्रिटीश वृत्तसंस्थेच्या माध्यमातून कंपनीने तशी घोषणा केली आहे. AstraZeneca द्वारे निर्मित करोना लस भारतात Covishield या नावाने सादर करण्यात आली. आता कंपनीने जागतिक स्तरावर स्वत: तयार केलेली ही लस मागे घेतली आहे. यापूर्वी, कंपनीने ब्रिटनमधील न्यायालयात, ही लस काहीजणांसाठी घातक ठरत असल्याचे मान्य केले होते. या लसीमुळे काही रुग्णांचे रक्त गोठण्यात आहे. त्यामुळे फार क्वचित रुग्णांवर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असेही कबूल केले होते.

न्यायालयात कंपनीने स्पष्ट कबुली दिल्यानंतर ब्रिटन, भारतासह संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. हा न्यायालयीन लढा चालू असतानाच काल अचानक कंपनीने व्यावसायिक कारणांमुळे ही लस बाजारातून काढून टाकली जात आहे, असे घोषित केले. ‘टेलिग्राफ’ने मंगळवारी याचा सविस्तर वृत्तांत दिला आहे.

‘यापुढे ही लस तयार केली जाणार नाही. तिची खरेदी-विक्री होणार नाही. लसीकरणामुळे दुष्परिणाम समोर येत असताना आम्ही हा निर्णय घेतला आहे. हा पूर्णपणे योगायोग आहे. बाजारातून लस काढून टाकण्याचे कारण काही वेगळेच आहे, असा युक्तिवाद कंपनीने केला आहे. कंपनीने याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. माहितीनुसार, बाजारातून लस मागे घेण्यासाठी ब्रिटन सरकारकडे ५ मार्च रोजी कंपनीने अर्ज केला होता. ७ मे रोजी त्याला संमती मिळाली आहे.

AstraZeneca द्वारे निर्मित करोना लस TTS - थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसाठी (रक्ताच्या गुठळ्या होण्यास) कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. AstraZeneca ने बनवलेली Vaxzevria ही लस यूकेसह अनेक देशांना पुरवण्यात आली होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान कंपनीने लसीकरणानंतर टीटीएस होण्याची शक्यता असल्याचे मान्य केले होते.

टीटीएसमुळे यूकेमध्ये किमान ८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्यांच्या पन्नासहून अधिक नातेवाईकांनी दाखल केलेल्या खटल्याचा कंपनी सामना करत आहे. भारतातील काही कुटुंबांनी कंपनीविरुद्ध खटले दाखल केले आहेत. मात्र, या किरकोळ घटना वगळता एका अंदाजानुसार, ६.५ दशलक्षाहून अधिक जीव केवळ आमच्या लसीमुळे दुसऱ्या लाटेत वाचवले. जागतिक स्तरावर तीन अब्जाहून अधिक डोस पुरवले गेले. आमच्या प्रयत्नांना जगभरातील सरकारांनी मान्यता दिली आहे आणि जागतिक महामारीचा अंत करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे, असे कंपनीने नमूद केले आहे.