देशभरात ६१ टक्के मतदान

सर्वाधिक ७५% आसामात, महाराष्ट्रात सर्वांत कमी ५४%


08th May, 01:11 am
देशभरात ६१ टक्के मतदान

न्यूज डेस्क। गोवन वार्ता      

नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९३ मतदारसंघांचा समावेश होता. यामध्ये सकाळी ७ पासून सायंकाळी ६ वा. मतदान संपले. देशभरात सुमारे ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान झाले.      

तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघ, गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १०, कर्नाटकातील १४, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाम ४, पश्चिम बंगालमधील ४, गोव्यातील २ आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांचा समावेश होता. यांपैकी देशभरात सर्वाधिक मतदान ७५.०१ टक्के आसाममध्ये नाेंद झाले, तर सर्वांत कमी मतदान ५४.०९ टक्के मतदान महाराष्ट्रात झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील निशान उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते.

बिहारमध्ये मतदानादरम्यान पीठासीन अधिकारी आणि होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला. छत्तीसगडच्या जशपूरमध्ये मतदानासाठी येत असताना एका वृद्ध मतदाराचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादचे भाजप उमेदवार आणि तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये काही जण जखमी झाले.

यापूर्वी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर आणि २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात ८८ जागांवर मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान झाले. आतापर्यंत एकूण २८३ जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.


हेही वाचा