बाचाबाची, शाईचा रंग, ईव्हीएममध्ये बिघाड....


08th May, 01:07 am
बाचाबाची, शाईचा रंग,  ईव्हीएममध्ये बिघाड....

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

पणजी : लाेकसभा निवडणुकी​साठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले असले, तरी काही ठिकाणी ईव्हीएममुळे गोंधळाची​ स्थिती निर्माण झाली. केपे येथे आमदार आणि नगरसेवकांत शाब्दिक चकमक उडाली, तर केपे पालिका क्षेत्रातील एका बुथवर एका मतदाराच्या नावावर आधी​च कोणी तरी मतदान केल्याचा प्रकार घडला.

केपेचे काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा व भाजपचे नगरसेवक दयेश नाईक यांच्यात बाचाबाची झाली. बूथ दहावर एक महिला मतदान करण्यास गेली असता तिच्या नावाने कोणी मतदान करून गेल्याने गोंधळ झाला. नंतर काही वेळाने ‘टेन्डर वोट पेपर’वर मतदान करण्यात आले. पणजीत मतदान केल्यानंतर बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर गेली, असा आरोप मतदार पॅट्रेशिया पिंटो यांनी केला. असाच प्रकार सुकूर-पर्वरी येथेही घडल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. साल्वादोर द मुंद येथील मतदान केंद्रावर रेबोनी शहा यांनी शाईच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रार दाखल केली. कासावली येथील सेंट थॉमस हायस्कूलमधील बूथ मध्ये बोटाला लावलेली शाई पाण्याने पुसली गेल्याची तक्रार माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी केल्यावर शाई बदलण्यात आली. यादरम्यान सुमारे बारा मिनिटे मतदान थांबविण्यात आले होते.

शिरोडा येथे ईव्हीएम बंद पडल्याने सुमारे अर्धा तासानंतर मतदानाला सुरुवात झाली, तर फोंडा येथील काँग्रेस नेत्याने भाजपला पाठिंबा दिल्याचा संदेश व्हायरल केल्याप्रकरणी प्रीतम हरमलकर याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. चावडी-काणकोण, म्हापशातील मरड तसेच सत्तरीतील मुरमुणे येथे मतदान यंत्रणेत बिघाड झाल्याचे समोर आले.

हेही वाचा