स्मार्ट सिटी पणजीतील मतदार उदासीन

उत्तर गोवा मतदारसंघातील सर्वांत कमी मतदान


08th May, 01:03 am
स्मार्ट सिटी पणजीतील मतदार उदासीन

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : मंगळवारी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले. राज्यातील एकूण मतदानाची अंतिम आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. मात्र निवडणूक आयोगाच्या ‘टर्नआऊट’ या मतदानाची टक्केवारी सांगणाऱ्या अॅपनुसार रात्री ११ पर्यंत उत्तर गोवा मतदारसंघात पणजी विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच ६७.२६ टक्के मतदान झाले होते. संपूर्ण राज्याचा विचार करता कमी मतदान होण्यामध्ये पणजी मतदारसंघ चौथ्या स्थानी होता.            

मंगळवारी सकाळी ७ वा. मतदान सुरू झाल्यावर पणजी शहरातील काही मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक मतदार होते. दुपारनंतर बहुतेक मतदान केंद्रात गर्दी कमी होती. उन्हाचा तडाखा वाढल्याने मतदारांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. संध्याकाळीही पणजीतील मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. यामुळे पणजीतील एकूण मतदानाचा आकडा कमी झाला. पणजीच्या बाजूला असणाऱ्या ताळगाव विधानसभा मतदासंघांत मात्र ७१.४८ टक्के मतदान झाले.            

उत्तर गोव्यातील अन्य विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत स्मार्ट सिटी पणजीत भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक तसेच काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप या दोघांनीही कमी प्रचार केला होता. घरोघरी प्रचारात काँग्रेसचे रमाकांत खलप थोडे कमी पडले. गेली काही वर्षे पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. यामुळे शहरातील मुख्य रस्ते खोदण्यात आले आहेत. बंद रस्ते, वाहतूक कोंडी, धुळीचे प्रदूषण यांमुळे पणजीकर वैतागले आहेत. याचा परिणाम मतदानावर झाला असण्याची शक्यता एका मतदाराने व्यक्त केली. 


हेही वाचा