सोशल मीडियावरून मतदारांची दिशाभूल; रेजिनाल्ड, रुबर्ट यांच्या नावे फेक पत्रके व्हायरल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th May, 12:02 pm
सोशल मीडियावरून मतदारांची दिशाभूल; रेजिनाल्ड, रुबर्ट यांच्या नावे फेक पत्रके व्हायरल

मडगाव : कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजीपी) दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट परेरा यांच्या नावे काल रात्रीपासून सोशल मीडियावरून फेक पत्रके व्हायरल होत आहे. मतदानाच्या आदल्याच रात्रीपासून हा प्रकार घडल्याने दोन्ही नेत्यांनी हे कृत्य करणाऱ्याच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे.

वरील फेक पत्रक पोस्ट केल्यापासून माझ्यावर खूप टीका झालेली आहे. पण, मी कुणालाही काहीही बोललेलो नाही. त्यांची परिस्थिती ते जाणतात, तशीच माझी परिस्थिती मी जाणतो. पण अशाप्रकारे फेक पत्रक व्हायरल करणे चुकीचे आहे. मी भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यांना पाठिंबा का दिला तेही सांगितलेले आहे, असा खुलासा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केले.


कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड तसेच आरजीपीचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार रुबर्ट परेरा यांच्याबाबत मतदानाच्या आदल्या रात्री बनावट पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या. आमदार रेजिनाल्ड यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेत आयडीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे बनावट पत्रात नमूद होते. यावर आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी खुलासा केला आहे.

माझ्या बनावट स्वाक्षरीसह सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट करण्यात आले आहे. ते काल रात्रीपासून व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मी भाजपबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचे दिसून आले आहे. मी आयडीसी अध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजपचा पाठिंबा काढून घेत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे फेक पोस्ट व्हायरल करून विरोधकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधक आताच जर असे प्रकार करत असतील तर, भविष्यात काय करतील, याचा विचार व्हावा, असे रेजिनाल्ड यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्या मतदारसंघातील अनेक कामे भाजपमुळे झालेली आहेत. जे आपल्याला मदत करतात त्यांच्यासोबत राहण्याचा संदेश आमचा धर्म देतो. मुख्यमंत्र्यांकडे अनेकवेळा प्रश्न मांडलेले असून एकदाही मुख्यमंत्र्यांनी अल्पसंख्याक म्हणून मला मागे पाठवलेले नाही. लोकांची सर्व कामे केलेली आहेत. लोकांच्या भावना मी जाणतो. सर्वांनाच गोवा सांभाळणे अपेक्षित आहे. मलाही मतदारसंघात विकास झालेला पाहिजे, असेही सांगितले, असे रेजिनाल्ड यांनी म्हटले आहे.


आरजीपीचे रुबर्ट परेरा करणार तक्रार

आरजीपीचे उमेदवार रुबर्ट परेरा यांनी गोव्याच्या भल्यासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे फेक पत्रक व्हायरल झाले. मतदान केल्यानंतर परेरा यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. मतदान दिवसाच्या आदल्या रात्री मी उमेदवारी मागे घेतली असल्याचे एक बनावट पत्रक समाजमाध्यमांवर फिरू लागले. असे खोटे सांगून मते मिळवण्याची गरज विरोधकांना का पडली? कारण त्यांनी काहीच कामे केलेली नाहीत. काम न केल्यानेच चुकीच्या पोस्ट घालण्याची गरज पडली. या बनावट पत्रकाविरोधात तक्रार करून योग्य त्या चौकशीची मागणी केली जाणार आहे, असेही स्पष्ट केले.

हेही वाचा