बार्शे-कुंकळ्ळीच्या रानात पिकनिकसाठी गेलेल्या विवाहीत तरुणाचा तळ्यात बुडून मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th April, 12:05 pm
बार्शे-कुंकळ्ळीच्या रानात पिकनिकसाठी गेलेल्या विवाहीत तरुणाचा तळ्यात बुडून मृत्यू

मडगाव : बार्शेमधील जंगलभागातील तळ्याजवळ पिकनिकसाठी गेलेल्या गटातील राजेंद्र शाबा वेळीप याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास सुरू केला आहे. राजेंद्र हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच मित्रांचा गट रविवारी पिकनिकसाठी बार्शे येथील जंगलमय परिसरातील तळ्याजवळ गेला होता. तळ्याजवळ पोहोचल्यावर या मित्रांनी गप्पागोष्टी केल्या व जेवणाचा बेत केलेला असल्याने जेवणासाठी लागणारी भांडी घेऊन राजेंद्र वेळीप तळ्यावर गेला. भांडी धुण्यासाठी गेलेला राजेंद्र तळ्यात पडला आणि बुडाला. हा प्रकार पाहून मित्रांनी आरडाओरड सुरू केला. स्थानिकांना माहिती दिली व सरपंचांनी या घटनेची माहिती कुंकळ्ळी पोलिसांना दिली.

कुंकळ्ळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तळ्यात उतरून राजेंद्रचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तासाभराच्या शोधानंतर राजेंद्रचा मृतदेह तळ्यात आढळला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा