निवडणूक आयोगाला सलाम... बर्फाच्छादित लडाखमध्ये दोन कुटंबांतील ५ जणांसाठी उभारले मतदान केंद्र

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th April, 11:56 am
निवडणूक आयोगाला सलाम... बर्फाच्छादित लडाखमध्ये दोन कुटंबांतील ५ जणांसाठी उभारले मतदान केंद्र

नवी दिल्ली : भारतातील लोकसभेची निवडणूक ही जगातील सर्वांत मोठी निवडणूक म्हणून गौरवली जाते. ही निवडणूक घेणे म्हणजे भारतीय निवडणूक आयोगासमोर मोठ्ठे आव्हान असते. दक्षिण भारतातील कडक उन्हाळी प्रदेशांपासून ते हिमालयाच्या थंडगार प्रदेशांमध्ये ही निवडणूक राबवणे तशी सोपी गोष्ट नाही. या आव्हानांना तोंड देत आयोग आपले काम करत असते. असेच एक आव्हान म्हणजे लडाखमधील मतदान.

देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. देशातील दुर्गम भागात मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लडाखमध्ये एक मतदान केंद्र आहे जिथे फक्त दोन कुटुंबे आहेत. या दोन कुटुंबांत केवळ ५ मतदार आहेत. असे असतानाही निवडणूक आयोगाने मतदानाची पूर्ण व्यवस्था केली आहे.
लडाख हा संपूर्ण देशातील असाच एक केंद्रशासित प्रदेश आहे, जिथे निवडणूक घेणे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान असेल. साधारणपणे बर्फाच्छादित लडाखमध्ये तापमान उणे राहते. यावेळी १,८२,५७१ मतदारांसाठी निवडणूक घेण्यासाठी ५७८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामध्ये एक मतदान केंद्र असे आहे, जिथे फक्त पाच मतदार मतदानाचा हक्क बजावणारआहेत. हे मतदान केंद्र बर्फाच्छादित भागात तंबूत बांधले जाईल. लडाखमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.

लडाखमध्ये किती मतदार आहेत?

लडाखचे मुख्य निवडणूक अधिकारी यतींद्र एम. मारळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेह आणि कारगील हे या केंद्रशासित प्रदेशातील दोन जिल्हे आहेत. येथे लोकसभेची एक जागा आहे. येथील मतदारांची संख्या १,८२,५७१ आहे. त्यामध्ये ९१ हजार ७०३ पुरुष आणि ९० हजार ८६८ महिला आहेत. त्यापैकी १११८ अपंग, ७०३० मतदार १८ ते १९ वयोगटातील, १५७० मतदार ८५ वर्षांवरील आणि ३६ मतदार १०० वर्षांवरील आहेत. काराकोरम पर्वतरांगातील सियाचीन ग्लेशियरपासून उत्तर-पश्चिमेला हिमालयापर्यंत पसरलेल्या लडाखमधील अत्यंत थंड वातावरण पाहता लोकसभा निवडणुकीसाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

लडाखमदील ५७८ मतदान केंद्रांपैकी लेह जिल्ह्यातील वारसी गावात एक अद्वितीय मतदान केंद्र बांधले जाईल. पूर्णपणे बर्फाने वेढलेल्या या भागात फक्त दोनच कुटुंबे राहतात. दोन्ही कुटुंबात एकूण पाच मतदार आहेत. या पाच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावे, यासाठी आयोग बर्फाळ शिखरे आणि दुर्गम रस्ते पार करत तंबू उभारून अनोखे मतदान केंद्र स्थापन केले आहे. केंद्र गरम ठेवण्यासाठी हीटरची व्यवस्था असेल. मतदारांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. ५७८ मतदान केंद्रांपैकी ३३ शहरी आणि ५४५ ग्रामीण भागात आहेत. सर्व भागात प्रचंड थंडी आहे. त्यामुळे येथील मतदारांना घराबाहेर काढणेही आयोगासमोर मोठे आव्हान असणार आहे. मतदारांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आयोग विविध कार्यक्रम राबवत आहे.

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये अनेक मतदान केंद्रे आहेत जिथे मतदान कक्ष आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. पाच मतदारांसाठी चॉपरचाही वापर केला जाणार आहे. अनेक रस्ते बर्फाने झाकलेले आहेत. या राज्यातील एक चांगली गोष्ट म्हणजे येथे संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील यादीत एकही मतदान केंद्र नाही. परिसरातील हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार २६६ मतदान केंद्रे कठीण भागात आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील मतदारांची संख्या वाढली आहे. परंतु, त्यापैकी २१० पुरुष मतदार कमी झाले असून ११,१३७ महिला मतदार वाढले आहेत.

हेही वाचा