६० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट

बारावीचा निकाल : शालान्त मंडळाच्या अहवालातून स्पष्ट


24th April, 01:32 am
६० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १०.४६ टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ६० ते १०० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही खूपच कमी झाले आहे. गोवा शालान्त मंडळाने जाहीर केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
२०२३ मध्ये एकूण १९ हजार ३७७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यांतील १८ हजार ४९७ उत्तीर्ण झाले होते. उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १० हजार २९१, म्हणजेच ५५.६३ टक्के जणांना ६० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले होते. तर २,३७१ विद्यार्थ्यांना म्हणजेच १२.८१ टक्के जणांना ८१ ते १०० टक्के गुण मिळाले होते. २०२४ मध्ये या दोन्ही श्रेणीतून विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यावर्षी उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ५,७४३ म्हणजेच ३८.५८ टक्के जणांना ६० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. तर ८.४७ टक्के विद्यार्थ्यांना (१,२६१ विद्यार्थी) ८१ ते १०० टक्के गुण मिळाले आहेत.
२०२४ मध्ये सर्वाधिक ३८.६६ टक्के विद्यार्थ्यांना ४६ ते ५९ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल १७ टक्के विद्यार्थ्यांना ३३ टक्के किंवा त्याहून कमी गुण मिळाले आहेत. २०२३ मध्ये ३०.८३ टक्के विद्यार्थ्यांना ४६ ते ५९ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. तर ३३ टक्के किंवा त्याहून कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.५४ टक्के इतके कमी होते.
सरकारी शाळांचा निकाल सरासरी ७०.४६ टक्के
२०२४ मध्ये सरकारी शाळांचा निकाल सरासरी ७०.४६ टक्के लागला आहे. राज्यातील ९ सरकारी शाळेत सांगे येथील सरकारी शाळेचा निकाल सर्वाधिक ८९.७२ टक्के आहे. पणजीतील टी. बी. कुन्हा सरकारी शाळेचा निकाल सर्वांत कमी ५०.७४ टक्के आहे.
गणितापेक्षा अवघड जीवशास्त्र
विषयानुसार पाहता, विद्यार्थ्यांना जीवशास्त्र गणितापेक्षा अवघड जात आहे. २०२४ मध्ये जीवशास्त्रमध्ये उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.५८ होती. विज्ञान आणि कला शाखेतील गणित या विषयात उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८२.०२ टक्के होती.

हेही वाचा