संविधानावरून भाजप-काँग्रेसमध्ये ‘युद्ध’

विरियातोंच्या वक्तव्याची खुद्द पंतप्रधानांकडून दखल; भाजप नेत्यांचा काँग्रेसवर चौफर हल्ला


24th April, 01:14 am
संविधानावरून भाजप-काँग्रेसमध्ये ‘युद्ध’

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून गोव्यासह देशभरातील राजकारण तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे इतर नेते यावरून काँग्रेसवर तुटून पडले आहेत, तर काँग्रेस नेत्यांकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी छत्तीसगड येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना विरियातो फर्नांडिस यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या गोव्यातील उमेदवाराने संविधानाबाबत चुकीचे वक्तव्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केला, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारीच सोशल मीडियाद्वारे विरियातो फर्नांडिस यांच्या वक्तव्यावरून निशाणा साधला होता. भारतीय राज्यघटना गोमंतकीयांवर जबरदस्तीने लादण्यात आल्याचा दावा काँग्रेसच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराने केला आहे. गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे ‘भारत तोडो’चे राजकारण तत्काळ थांबवावे. काँग्रेस हा आपल्या लोकशाहीला धोका असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. त्यानंतर या विषयाची आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गंभीर दखल घेतली आहे.

नेमके काय म्हणाले होते विरियातो?
गत लोकसभा निवडणुकीच्या काळात १० मार्च २०१९ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्यात आले होते. त्यावेळी ‘गोंयचो आवाज’ संघटनेमार्फत आपल्याला त्यांच्याशी संवाद साधण्यास मिळाला.
त्यावेळी आपण राहुल गांधी यांच्यासमोर गोव्यातील १२ मुद्दे उपस्थित केले होते. त्यात दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्याचाही समावेश होता; परंंतु त्यावेळी राहुल गांधी यांनी हा मुद्दा संविधानिक असल्याचे सांगत चर्चेस नकार दिला.
त्यावेळी आपण त्यांना २६ जानेवारी १९४९ रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली. त्यावेळी गोवा भारताचा भाग नव्हता; परंतु १९६१ मध्ये गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान गोमंतकीय जनतेवर लादण्यात आल्याचे सांगितले.
काश्मीरसाठी केंद्राने कलम ३७० लागू केले; परंतु गोव्यासाठी काहीही केले नाही. दुहेरी नागरिकत्वाच्या विषयाचा फटका पोटासाठी इतर देशांमध्ये जाणाऱ्या गोमंतकीयांना बसत असल्याचेही आपण त्यांना सांगितले. त्यावेळी राहुल यांनी आपले म्हणणे मान्य केले.

भाजपकडून विरियातोंना अपात्र ठरवण्याची मागणी
भाजपचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मंगळवारी सकाळी पणजीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत, विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाचा अपमान केल्याची टीका केली. तसेच याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, संविधानविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी विरियातो फर्नांडिस यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात यावे​, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे म्हणणे काय?
कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्या व्हीडिओतील ठरावीक भाग कापून त्या शब्दांचा भाजपने विपर्यास केल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
विरियातो फर्नांडिस यांनी​ २६ वर्षे देशाची सेवा केली आहे. कारगीलच्या लढाईतही त्यांनी सहभाग घेतला. अशा व्यक्तीला संविधानविरोधी म्हणणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला.
भाजपचा राज्यातील दोन्ही जागांवर पराभव निश्चित आहे. त्यामुळेच भाजपकडून चुकीच्या पर्यायांचा वापर केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी गोवा आणि काँग्रेस उमेदवाराबाबत चुकीची वक्तव्ये करून इतर राज्यांतील जनतेत गैरसमज पसरवू नये, असे ते म्हणाले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
देशाला तोडण्याची चाल काँग्रेसने पुन्हा एकदा सुरू केली आहे.
कर्नाटकातील काँग्रेस खासदाराने ‘दक्षिण भारत वेगळा देश करू’, अशी हमी दिली होती. त्यानंतर आता गोव्यातील लोकसभा उमेदवार संविधान गोव्यावर लादल्याचा आरोप करत आहेत. भारताचे संविधान गोव्याला लागू होत नसल्याचे तो म्हणत आहे.
काँग्रेस उमेदवाराने असे वक्तव्य करून भारतीय संविधान आणि त्याची निर्मिती करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे.
जम्मू-काश्मिरातील कलम ३७० आम्ही हटवले. त्यामुळे आज तेथे देशाचे संविधान चालत आहे. त्यामुळे तेथील जनता भाजप सरकारला धन्यवाद देत आहे.
मोदींना प्रत्युत्तर देताना विरियातो म्हणतात...
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या इतर नेत्यांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
मोदींनी गोमंतकीयांना अनेक आश्वासने दिली आहेत. ती अद्याप पूर्ण केलेली नाहीत. त्यावर मोदी का बोलत नाहीत ?
भाजपने गोव्यासह देशभरात इतर पक्षांच्या आमदारांना फोडण्याचे सत्र सुरू ठेवून संविधानाचा खून केला आहे, त्यावर मोदींनी बोलावे.
भाजपचे अनेक नेते बहुमत मिळाल्यास संविधान नष्ट करण्याची भाषा करतात, त्यांचे काय?
आपल्या वक्तव्याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जाहीर चर्चा करण्यास तयार आहे. तारीख, वेळ आणि जागा त्यांनी​ सांगावी.
कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी संविधानासह गोव्यातील जनता आणि गोवामुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. गोमंतकीयांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
केवळ भाजपने केलेल्या तक्रारीवरून कॅ. विरियातो फर्नांडिस यांना अपात्र ठरवले जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्यानंतर आम्ही योग्य ते उत्तर देऊ.
- अॅड. कार्लुस फेरेरा, काँग्रेस आमदार
मोदींची २७ रोजी वास्कोत सभा
लाेकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा २७ एप्रिल रोजी विरियातो फर्नांडिस यांच्या वास्को तालुक्यात होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी विरियातो फर्नांडिस यांच्यावर कशाप्रकारे निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.