मंगेशी येथील सुमारे ८० गाड्यांवर पडणार ‘हातोडा’

गाडेधारकांना पंचायतीकडून दिलेली सात दिवसांची मुदत शुक्रवारी येणार संपुष्टात


24th April, 01:11 am
मंगेशी येथील सुमारे ८० गाड्यांवर पडणार ‘हातोडा’

हटवण्याचे आदेश देण्यात आलेले मंगेशी येथील गाडे.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : मंगेशी येथील सुमारे ८० गाडे हटवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असून पंचायतीने गाडेधरकांना जागा रिकामी करण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पंचायत मंडळाने गाडे हटवण्याचा ठराव घेतला आहे.
मंगेशी मंदिराजवळील गाडेधारकांना वेलिंग-प्रियोळ पंचायतीने २० एप्रिल रोजी नोटीस बजावून गाडे हटवण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. त्यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी पंचायतीने ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली होती. फक्त ७ गाडेधारकांनी त्याला उत्तर दिले. न्यायालयाने गाडे हटवण्याचा आदेश दिल्याने १६ एप्रिल रोजी पंचायत मंडळाच्या बैठकीत ठराव घेण्यात आला आहे. गाडेधारकांना दिलेली मुदत शुक्रवारी संपुष्टात येत आहे.
मंगेशी देवस्थानचे कर्नाटकात राहणारे एक महाजन गेल्यावर्षी मंगेशी येथे आले होते. त्यावेळी मंदिर परिसरातील गाड्यांच्या मधून अचानक एक लहान मूल कारसमोर आले होते. ब्रेक लावल्याने अपघात टळला होता. त्या महाजनाने मंदिराजवळील गाडे हटवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सकाळी सुनावणी झाली. त्यावेळी पंचायत मंडळाचा ठराव आणि गाडेधारकांना दिलेली नोटीस न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायालयाने गाडेधारकांवर कारवाईचा आदेश दिला.
मंगेशी मंदिराजवळील गाडे ६०-७० वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहेत. दररोज हजारो भाविक मंदिरात येतात. त्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल होते. उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने काही गाडेधारकांनी जागा रिकामी करण्याची तयारी सुरू केली आहे. पर्यटन खात्यातर्फे काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून स्थानिक विक्रेत्यांसाठी जवळच नवीन गाडे उभारले होते. तेथे व्यवसाय होणार नाही, हे कारण देऊन गाडेधारकांनी तेथे स्थलांतर केलेले नाही. त्यामुळे ५-६ वर्षे गाडे बंदअवस्थेत आहेत.