झाडांच्या पानांमुळेच कोसळला कला अकादमीच्या सिलिंगचा भाग

‘पीडब्ल्यूडी’ आज​ सादर करणार अहवाल


24th April, 01:09 am
झाडांच्या पानांमुळेच कोसळला कला अकादमीच्या सिलिंगचा भाग

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कला अकादमीच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या स्लॅबवर मोठ्या प्रमाणात झाडाची पाने साचलेली होती. त्यामुळे अचानक आलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. हे पाणी वाट मिळेल तसे स्लॅबमध्ये शिरल्यामुळेच सिलिंगचा एक भाग कोसळला असा दावा करत, यासंदर्भातील अहवाल सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) बुधवारी सरकारला सादर करणार आहे, अशी माहिती खात्याच्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
चार दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पुन्हा एकदा नूतनीकरण केलेल्या कला अकादमीच्या इमारतीला बसला. यात इमारतीच्या सिलिंगचा एक भाग कोसळला. यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर या घटनेची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ‘पीडब्ल्यूडी’कडून अहवाल मागवला होता. त्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ बुधवारी सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, कला अकादमीच्या इमारतीची साफसफाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे इमारतीच्या स्लॅबवर मोठ्या प्रमाणात झाडांच्या पानांचा कचरा साचून राहिला होता. या पानांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. हे पाणी स्लॅबमध्ये घुसल्यामुळेच सिलिंगचा एक भाग कोसळला, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.