७,५४४ मतदारांची नावे यादीतून वगळली

राज्यात एकूण ११,७९,६४४ मतदारांची नोंद


24th April, 12:41 am
७,५४४ मतदारांची नावे यादीतून वगळली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नवीन मतदार नोंदणी सुरू केल्यापासून अखेरच्या दिवसापर्यंत राज्यात नव्या १९,९४९ मतदारांची नोंद झाली आहे. आयोगाने दोन्ही मतदारसंघांतून मृत्यू झालेल्या, दोन ठिकाणी नोंदणी असलेल्या, मतदानासाठी अपात्र ठरलेल्या, गायब असलेल्या, तसेच स्थलांतर केलेल्या एकूण ७,५४४ मतदारांची नावे यादीतून वगळली आहेत.
आयोगाने ५ जानेवारी २०२४ पासून नवमतदारांच्या नोंदणीस सुरुवात केली होती. ही नोंदणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत १९ एप्रिलपर्यंत सुरू होती. या कालावधीत नवीन १९,९४९ मतदारांनी नोंदणी केली. त्यानंतर आयोगाने उत्तर गोव्यातील १,५७८ पुरुष आणि १,९७७ महिला, तर दक्षिण गोव्यातील १,८०८ पुरुष आणि २,१८१ महिलांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत. यात मृत पावलेल्या २,१९४, दोन ठिकाणी नोंदणी असलेल्या ३५५, मतदानासाठी अपात्र ठरलेल्या ३७१, गायब असलेल्या ३७५ आणि गोव्यातून स्थलांतर केलेल्या ४,२६९ मतदारांचा समावेश आहे.
१८-१९ वर्षांचे २८,०४२ मतदार
१८-१९ वर्षे वयोगटातील नवमतदारांची संख्या २८,०४२ इतकी आहे. यात उत्तर गोव्यातील १३,२४४ आणि दक्षिण गोव्यातील १४,७९८ मतदारांचा समावेश आहे. उत्तर गोव्यात ४,९७७ आणि दक्षिण गोव्यात ४,४४६ असे एकूण ९,४२३ दिव्यांग मतदार आहेत. वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेले उत्तर गोव्यात ६,२८६ आणि दक्षिण गोव्यात ५,२१६ असे एकूण ११,५०२ मतदार आहेत. विदेशात असलेल्या ८४ मतदारांची दोन्ही जिल्ह्यांत नोंद झाली आहे.