अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; आरोप निश्चितीचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 12:37 am
अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; आरोप निश्चितीचा आदेश

पणजी : चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध घालून मुरगाव तालुक्यातील १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी ४५ वर्षीय व्यावसायिकाला अटक केली होती. यात प्रथमदर्शनी सबळ पुरावा असल्याचे निरीक्षण नोंदवून जलदगती व पॉक्सो न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.

पीडित मुलीने संशयिताच्या विरोधात वास्को पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानुसार, पीडिता आणि संशयिताची मुलगी मैत्रिणी आहेत. त्यामुळे पीडितेचे संशयिताच्या घरी येणे-जाणे होते. याचा गैरफायदा घेऊन संशयिताने तिला गुंगीचे औषध घालून चाॅकलेट दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पोलिसांनी या प्रकरणी भा.दं.सं.च्या कलम ३२८, ३७६, बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४,८, १२ आणि ज्युवीन्हल जस्टीस कायद्याचे कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडितेच्या वैद्यकीय चाचणीतून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जलदगती व पॉक्सो न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले. पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर केले. याची दखल घेऊन पाॅक्सो न्यायालयाने आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला. दरम्यान, संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.