विरियतो म्हणतात, ‘व्हीडिओतील ठरावीक भाग कट करून माझ्या विधानाचा विपर्यास’

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April, 05:54 pm
विरियतो म्हणतात, ‘व्हीडिओतील ठरावीक भाग कट करून माझ्या विधानाचा विपर्यास’

मडगाव : व्हीडिओतील ठरावीक भाग कट करून त्या शब्दांचा विपर्यास करण्याचा प्रयत्न झालेला आहे. देशाची सेवा करताना लढाईतही सहभाग घेतला. संविधानाबाबत मला आदर आहे. बेरोजगारी, महागाई, इंधन, गॅस सिलिंडरच्या किमती, वाढते अपघात व महिलांवर वाढलेले अत्याचार यावर मुख्यमंत्र्यांनी खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान दक्षिण गोव्याचे काँग्रेस उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी आज पुन्हा केले आहे.

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत कॅ. विरियातो फर्नांडिस, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार एल्टन डिकॉस्टा, आमदार कार्लुस फेरेरा आदी उपस्थित होते.

राज्यातील प्रमुख मुद्द्यावरून जनतेचे लक्ष बाजूला करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. देशासाठी २६ वर्षे सेवा करणार्‍याला संविधानविरोधात म्हणणे चुकीचे ठरेल. काँग्रेसची लढाई संविधान संवर्धनासाठी आहे. भाजपचा राज्यातील दोन्ही जागांवर पराभव निश्चित असल्याने भाजपकडून चुकीच्या पर्यायांचा वापर केला जात आहे. पंतप्रधानांनी गोव्याबाबत व काँग्रेस उमेदवाराबाबत चुकीची वक्तव्ये करून दुसर्‍या राज्यातील लोकांमध्ये गैरसमज पसरवू नये, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

विरियातो फर्नांडिस हे दक्षिण गोव्यातून जिंकत असल्याचे दिसत आल्याने भाजपकडून चुकीचे आरोप केले जात आहेत. विरोधी आमदारांना पक्षात घेत संविधानाचा अनादर भाजप करत असून हे देशभरात सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्यावर योग्य ते उत्तर देऊ. या तक्रारीवरुन विरियातो यांना अपात्र ठरवले जाऊ शकत नाही, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सांगितले.

आरजीपी भाजपची ‘बी’ टीम हे सिद्द

भाजपकडून व्हीडिओतील ठरावीक भाग दाखवत टीका करण्यात आल्यावर आरजीपीच्या मनोज परब यांची पहिली प्रतिक्रिया येणे हे आरजीपी भाजपची ‘बी’ टीम असल्याचे दाखवते. महत्त्वाचे विषय बाजूला ठेवत विरोधकांवर टीका करण्यासाठी भाजपकडून आरजीपीचा वापर होत असल्याची टीका अमित पाटकर व एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांवर आरोप

बेरोजगारी, महागाई, इंधन, गॅस सिलिंडरच्या किमती, वाढते अपघात व महिलांवर वाढलेले अत्याचार यावर मुख्यमंत्र्यांनी खुल्या चर्चेला यावे, असे आवाहनही कॅ. विरियातो यांनी केले आहे.