विरियातोंच्या ‘त्या’ वक्तव्याची खुद्द पंतप्रधानांकडून दखल.... सविस्तर वाचा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April, 04:20 pm
विरियातोंच्या ‘त्या’ वक्तव्याची खुद्द पंतप्रधानांकडून दखल.... सविस्तर वाचा

पणजी : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानासंदर्भात केलेल्या वक्तव्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. छत्तीसगड येथे मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत बोलताना, काँग्रेसच्या गोव्यातील उमेदवाराने संविधानाबाबत चुकीचे वक्तव्य करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

गत लोकसभा निवडणुकीच्या काळात १० मार्च २०१९ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी गोव्यात आले होते. त्यावेळी ‘गोंयचो आवाज’ संघटनेमार्फत आपल्याला त्यांच्याशी संवाद साधण्यास मिळाला. त्यावेळी आपण त्यांच्यासमोर गोव्यातील १२ मुद्दे उपस्थित केले होते. त्यात दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्याचाही समावेश होता. परंंतु त्यावेळी राहुल गांधी यांनी हा मुद्दा संविधानिक असल्याचे सांगितले होते, असे म्हणत केंद्राने भारतीय संविधान गोमंतकीयांवर लादल्याचा दावा कॅ. फर्नांडिस यांनी दक्षिण गोव्यातील एका सभेत बोलताना केला होता. त्यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारीच सोशल मीडियाद्वारे विरियातो फर्नांडिस यांच्यावर निशाणा साधला होता. भारतीय राज्यघटना गोमंतकीयांवर जबरदस्तीने लादण्यात आल्याचा दावा काँग्रेसच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराने केला आहे. गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे ‘भारत तोडो’चे राजकारण तत्काळ थांबवावे. काँग्रेस हा आपल्या लोकशाहीला धोका असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले होते. त्यानंतर या विषयाची आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गंभीर दखल घेतली आहे.

भाजपकडून विरियातोंना अपात्र ठरवण्याची मागणी

भाजपचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मंगळवारी सकाळी पणजीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत, विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाचा अपमान केल्याची टीका केली. तसेच याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, संविधानविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी विरियातो फर्नांडिस यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात यावे​, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे म्हणणे काय?

- कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्या व्हीडिओतील ठरावीक भाग कापून त्या शब्दांचा भाजपने विपर्यास केल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

- विरियातो फर्नांडिस यांनी​ २६ वर्षे देशाची सेवा केली आहे. कारगिलच्या लढाईतही त्यांनी सहभाग घेतला. अशा व्यक्तीला संविधानविरोधी म्हणणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला.

- भाजपचा राज्यातील दोन्ही जागांवर पराभव निश्चित आहे. त्यामुळेच भाजपकडून चुकीच्या पर्यायांचा वापर केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी गोवा आणि काँग्रेस उमेदवाराबाबत चुकीची वक्तव्ये करून इतर राज्यांतील जनतेत गैरसमज पसरवू नये, असे ते म्हणाले.

- विरियातो फर्नांडिस हे दक्षिण गोव्यातून जिंकत असल्याचे दिसत आल्याने भाजपकडून चुकीचे आरोप केले जात आहेत. विरोधी आमदारांना पक्षात घेत भाजपनेच संविधानाचा अनादर केला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नोटीस आल्यानंतर योग्य उत्तर देऊ : कार्लुस

केवळ भाजपने केलेल्या तक्रारीवरून कॅ. विरियातो फर्नांडिस यांना अपात्र ठरवले जाऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडून नोटीस आल्यानंतर आम्ही योग्य ते उत्तर देऊ, असे काँग्रेस आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी स्पष्ट केले.