मानकुरादच्या दरात आला गोडवा; मिरची मात्र पुन्हा झोंबणार!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April, 02:28 pm
मानकुरादच्या दरात आला गोडवा; मिरची मात्र पुन्हा झोंबणार!

पणजी : आवक वाढल्याने मानकुराद आंब्याचे दर उतरले आहेत. मंगळवारी पणजी बाजारात मानकुराद आंब्याचे दर आकारानुसार ६०० ते ८०० रुपये डझन होते. हापूस आंबा ४०० ते ५०० तर पायरी आंबा ४०० रुपये प्रती डझन होता. मागच्या आठवड्याच्या तुलनेने बाजारात अन्य भाज्यांचे दर स्थिर होते. मात्र मिरची, ढबू मिरची १२० रुपये तर वाल पापडी बीन्स २०० रुपये किलो दराने विकले जात होते.

आले आणि लसणाचे दर मात्र वाढले आहेत. आले २२० रुपये तर लसूण ४०० रुपये प्रती किलो झाला आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत पणजी बाजारात बटाट्याचे दर १० रुपयांनी वाढून ५० रुपये प्रतिकिलो झाले. कांदा, टोमॅटोचे अनुक्रमे ३५ रु. आणि ३० रुपये होते. मंगळवारी फलोत्पादन गाड्यांवर कांदा २७ रु, टोमॅटो २५ रु., बटाटा ३५ रु. तर मिरची ७९ रुपये प्रतिकिलो होती.

पणजी बाजारात लिंबू आकारानुसार ८ ते १० रुपये प्रतिनग होता. वांगी ५० रुपये, भेंडी ८० रु., दोडका ८० रु., गाजर ८० रु., कारले ८० रु. प्रतिकिलो दराने विकले जात होते. कोबी ४० रुपये किलो तर फ्लॉवर ४० रुपये प्रतिगड्डा होता. याशिवाय कोथिंबीर २०, पुदिना आणि तांबडी भाजी १० रु. तर मेथी १५ रुपयेला जुडी होती.