संविधानाचा अपमान करणाऱ्या विरियातो फर्नांडिस यांना अपात्र करा : भाजपची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
23rd April, 01:52 pm
संविधानाचा अपमान करणाऱ्या विरियातो फर्नांडिस यांना अपात्र करा : भाजपची मागणी

पणजी : काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाचा अपमान केला आहे. त्यांना संविधानानुसार चालणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याचा आधिकार नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावे, अशी मागणी
भाजपने केली आहे. याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली.

पणजीत भाजप मुख्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार कामत बोलत होते. यावेळी माजी आमदार दामू नाईक व ग्लेन टिकलो आणि माजी मंत्री दिलीप परुळेकर उपस्थित होते.

विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाबाबत केलेले विधान गंभीर आहे. कोणताही उमेदवार अर्ज दाखल करताना एक शपथ घेत असतो. त्यानुसार उमेदवाराला भारतीय संविधानाचे रक्षण करून त्याचा मान मान राखू असे सांगावे लागते. असे असूनही फर्नांडिस यांनी गोवा मुक्तीनंतर गोवेकरांवर संविधान लादले, असे विधान केली. अशी टिप्पणी धक्कादायक आहे. याबाबत काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही आमदार कामत यावेळी म्हणाले.

गोवा मुक्त झाला तेव्हाही भारताचे पंतप्रधान कोण होते, हे देखील काँग्रेसने सांगावे. भारताचे संविधान जगातील उत्कृष्ट संविधानापैकी एक समजले जाते. फर्नांडिस यांनी संविधान लिहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील अपमान केला आहे. याबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिल्ली येथील निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असेही ते म्हणाले.