भारतीय संविधान गोव्यावर बळजबरी लादले! काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त विधान

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काँग्रेस उमेदवार विरियतो यांचा घेतला खरपूस समाचार; भाजपने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 01:42 pm
भारतीय संविधान गोव्यावर बळजबरी लादले! काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त विधान

पणजी : भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आले होते. गोवा १९६१ साली स्वतंत्र झाल्यानंतर तेच संविधान गोवेकरांच्या माथ्यावर मारण्यात आले. संविधान लागू करताना गोवेकरांना विचारात घेतले नव्हते, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी जाहीर सभेत केले आहे. या विधानावरून आता गोव्यातील राजकीय वातावरण तापत चालले आहे. भाजपने याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून त्यांना निवडणूक लढण्यास अपात्र करण्याची मागणी केली आहे. तर, काँग्रेसने फर्नांडिस यांच्या विधानाला पाठिंबा देत भाजप विधानाचा विपर्यास्त करत असल्याची टीका केली आहे.

काय म्हणाले काँग्रेस उमेदवार कॅ. विरियतो?

सध्या गोव्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार चांगलात रंगात आला आहे. याच प्रचारादरम्यान, काल (ता. २३) जाहीर सभेत काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानावर आक्षेपार्ह विधान केले. विषय होता दुहेरी नागरिकत्वाचा. काँग्रेस नेत राहुल गांधी यांच्यासोबत १० मार्च २०१९ मध्ये काँग्रेसने गोव्यात बैठक घेतली. त्यामध्ये आम्ही दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला. तो राहुल गांधींना पटला, असे कॅ. विरियतो यावेळी म्हणाले. हेच सांगताना त्यांनी भारतीय संविधान बळजबरी गोव्यावर कसे लादले, याचे विश्लेषण केले.

‘भारतात जेव्हा संविधान लागू झाले तेव्हा गोवा भारताचा भाग नव्हता. १९६१ साली गोवा स्वतंत्र झाल्यानंतर येथील लोकांची मते जाणून न घेता ते संविधान माथ्यावर मारण्यात आले’, असे विरियतो यावेळी म्हणाले. दुहेरी नागरिकत्व गोव्यातील तरुणांसाठी महत्त्वाचे आहे. येथील नागरिकांना पोर्तुगालवर प्रेम आहे. पोर्तुगालने त्यांना नागरिकत्व दिल्याने त्यांना विदेशात नोकरीला जाणे सोयीचे ठरते. त्यातून ते आपला आणि कुटुंबाचा आर्थिक विकास करत आहते, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने ‘भारत तोडो’चे राजकारण थांबवावे : मुख्यमंत्र्यांनी डागली तोफ

दरम्यान, याच विधानावरून आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लगेच सोशल मीडियावरून तीव्र आक्षेप नोंदवला. ‘गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे ‘भारत तोडो’चे राजकारण तत्काळ थांबवावे. काँग्रेस हा आपल्या लोकशाहीला धोका असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

भारतीय संविधानाबद्दल गोव्याच्या काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त विधान, ऐका..

विरियतो फर्नांडिस यांनी संविधानाचा अपमान केला आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र करावे, अशी मागणी केली आहे - दिगंबर कामत, आमदार, भाजप