राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टा पेजवर... ‘मुंबईच्या दोन वादळांची पडली गाठ’

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 11:26 am
राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टा पेजवर... ‘मुंबईच्या दोन वादळांची पडली गाठ’

मुंबई : झी मराठीवर २००३ साली गाजलेल्या ‘वादळवाट’ मालिकेचे शीर्षकगीत तुम्हाला माहितीच असेल. याच शीर्षकगीताने ‘राजस्थान रॉयल्स’ या आयपीएल संघाच्या इन्स्टाग्राम पेजवर लक्ष वेधून घेतले आहे. ‘मुंबईच्या दोन वादळांची पडली गाठ’ असे कॅप्शन देऊन एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हीडिओचे पार्श्वसंगीत म्हणून ते शीर्षकगीत जोडण्यात आले आहे. या व्हीडिओमध्ये मैदानावर एकमेकांच्या विरोधात लढणारे रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. हा व्हीडिओ पाहून प्रेक्षकांनी ‘मन जिंकलस भावा’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

राजस्थान रॉयल्सच्या रीलमध्ये सरावादरम्यानचा एक क्षण शेअर केलेला आहे. त्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित हा राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला भेटायला गेल्याचे दिसत आहे. तिथे रोहित जैस्वालशी हात मिळवतो आणि त्याच्या बाजूला बसतो. खरे पाहिले तर या रीलमध्ये एवढेच आहे. पण, विशेष बाब म्हणजे कॅप्शन आणि गाण्यामुळे हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

यशस्वीच्या शानदार शतकासह राजस्थानने मुंबई इंडियन्सवर ९ विकेट्स आणि ८ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात खऱ्या अर्थाने चमकलेल्या खेळाडू यशस्वीने ६० चेंडूत ७ षटकार आणि ९ चौकारांसह १०४ धावांची नाबाद खेळी केली. तर संदीप शर्माने ४ षटकांत १५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. संदीप व यशस्वीच्या खेळीमुळे राजस्थानने मुंबईच्या संघावर १८.४ शतकात मात केली. या विजयांनंतर राजस्थान रॉयल्सने १४ पॉईंट्ससह आयपीएल पॉईंट टेबलमध्ये टॉपचे स्थान कायम राखले.

राजस्थानच्या विजयाइतकीच सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका खास पोस्टची सुद्धा चर्चा आहे. परस्परविरोधी संघातील खेळाडूंच्या मैत्रीचा व्हीडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. मराठी प्रेक्षकांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गाण्याची रील राजस्थानने सामन्याआधी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती, ज्यावर लोकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

२००३ साली झी मराठीवर ‘वादळवाट’ नावाची मालिका प्रसारित व्हायची. मात्र, आजही या मालिकेतील पात्रे रसिकांच्या मनावर राज्य करतात. शिवाय देवकी पंडित यांनी गायलेले आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेले मालिकेचे शीर्षकगीत प्रेक्षकांना अजूनही तोंडपाठ आहे. हेच गीत राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टा पेजवर चांगलेच लक्ष वेधून घेत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित हा एक मुंबईत लहानाचा मोठा झालेला क्रिकेटपटू आहे. तर भारतीय संघाचा आणि राजस्थान रॉयलचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल हाही मुंबईकर आहे. दोन्ही मुंबईकर जेव्हा जयपूरमध्ये भेटतात, तेव्हाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झालेत. यशस्वी रोहितजवळ जाऊन आदराने हात मिळवतो, असा हा क्षण आहे.