वेगाने वितळू लागलाय हिमालयातील बर्फ; इस्रोने दिले जलप्रलयाचे दिले संकेत

इस्रोने सॅटेलाइटवरून केलेल्या निरीक्षणाचा अहवाल छायाचित्रासह केला जाहीर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 10:34 am
वेगाने वितळू लागलाय हिमालयातील बर्फ; इस्रोने दिले जलप्रलयाचे दिले संकेत

श्रीहरीकोट्टा : जगभरात नैसर्गिक आपत्तींची मालिका सुरू असतानाच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) नवीन चिंताजनक अहवाल जारी केला अाहे. त्यात हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेग अलिकडच्या दिवसांत प्रचंड वाढल्याचे नमूद केले आहे. यामुळे उत्तर भारतातील अनेक नद्यांना भीषण महापूर येण्याचे संकेत दिले आहेत.

हिमालयाला भारताचा मुकुट म्हटले जाते. हे भारताचे नैसर्गिक संरक्षक आहे. सायबेरियातून येणारे थंड वारे रोखून भारतात एक वेगळी हवामान व्यवस्थाही निर्माण केली जात आहे. हिमालयाला तिसरा ध्रुव देखील म्हटले जाते. कारण या पर्वतावर मोठ्या हिमनद्या आणि बर्फाचे प्रचंड ढिगारे आहेत. याच हिमनद्या आणि बर्फ जागतिक तापमान वाढीमुळे वेगाने वितळत असल्याचा अहवाल इस्रोने दिला आहे.

इस्रोने अनेक दशकांच्या उपग्रहांनी टिपलेल्या प्रतिमांचे विश्लेषण करत गंभीर नोंदी केल्या आहेत. भारतीय हिमालयातील हिमनद्या चिंताजनक वेगाने वितळत आहेत. त्यामुळे हिमालयातील हिमनदी सरोवरांचा विस्तार कल्पनेपलिकडे वाढत चालला आहे. हे धोक्याचे आहे, असे निष्कर्ष त्यांनी नोंदवले आहेत.

हिमालयातील हिमनद्या आणि हिमनदी तलाव हे उत्तर भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे जलस्रोत आहेत. जगभरात केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, १८ व्या शतकातील औद्योगिकीकरणानंतर जगभरातील उंच पर्वतावरील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. त्या त्यांच्या मूळ ठिकाणाहून मागे हटत आहेत. याचा अर्थ आज जिथे हिमनद्या आहेत तिथे त्यांचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. हिमनदीच्या वितळण्यामुळे तेथे सरोवराची निर्मिती होते.

या तलावांमुळे कधी कधी मोठा धोका निर्माण होतो. म्हणजेच, बऱ्याच वेळा हिमनदीचे तलाव फुटतात, ज्यामुळे सखल भागात पूर येतो. ज्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या समुदायांसाठी विनाशकारी परिणाम होतात, असे इस्रोच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


१९८४ पासून हिमालयात ६७६ नवीन तलावांची निर्मिती

१९८४ ते २०२३ पर्यंतच्या हिमनद्यांचा उपग्रह डेटा इस्रोकडे उपलब्ध आहे. त्यावरून असे दिसून आले आहे की, २०१६-१७ मध्ये, नदीच्या खोऱ्यांमध्ये १० हेक्टरपेक्षा मोठे एकूण २,४३१ हिमनद्यांचे तलाव होते. १९८४ पासून या प्रदेशात आश्चर्यकारक ६७६ तलाव विकसित झाले. त्यापैकी १३० तलाव भारतात आहेत. त्यापैकी ६५ सिंधू खोऱ्यात, ७ गंगेच्या खोऱ्यात आणि ५८ ब्रह्मपुत्रा खोऱ्यात आहेत, असे इस्रोने अहवालात नमूद केले आहे.

या तलावांचा विस्तार आश्चर्यकारकपणे होत आहे. ६०१ तलावांचा आकार दुपटीने वाढला आहे. दहा तलाव दीड ते दोन पटीने मोठे झाले आहेत. याशिवाय ६५ तलाव दीडपट मोठे झाले आहेत. अनेक तलाव हिमालयात खूप उंचावर आहेत. त्यापैकी ४,०००-५,००० मीटर उंचीवर सुमारे ३१४ तलाव आहेत, तर ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर २९६ हिमनदी तलाव आहेत, असे इस्रोने विश्लेषणात म्हटले आहे.

हिमनदी सरोवर फुटल्यास येतो पूर

हिमनद्या वेगाने वितळत असताना, तयार झालेल्या तलावांचा आकार वेगाने वाढू लागतो. यातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय बदल होत असल्याचे ठळकपणे स्पष्ट होते. हिमनदी सरोवरांचा विस्तार आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी येत असल्याने ते फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. जेव्हा असे तलाव फुटतात तेव्हा ते डोंगराळ भागात विनाशकारी पूर आणतात. उत्तराखंडमध्ये अलिकडच्या वर्षांत असे पूर आले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असेही या अहवालात इस्रोने स्पष्ट केले आहे.