चीनमध्ये भीषण पूर; १ लाखाहून अधिक बेघर! ४४ नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

आतापर्यंत १६५ कोटींचे नुकसान * १२ कोटी लोकांना या वादळाचा फटका * १ हजाराहून अधिक शाळा बंद * इंटरनेट सेवा कोलमडली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 10:14 am
चीनमध्ये भीषण पूर; १ लाखाहून अधिक बेघर! ४४ नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

बीजिंग : वादळ, पाऊस झाल्यानंतर आता कालपासून भीषण पुरामुळे चीनमध्ये मोठा विध्वंस सुरू झाला आहे. दक्षिण चीनमध्ये अतिवृष्टीमुळे ४ लोकांचा मृत्यू झाला असून १० लोक बेपत्ता झाले आहेत. दक्षिण चीनमध्ये १६ एप्रिलपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे ४४ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या नदीकाठच्या भागांतील १ लाखाहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. या लोकांना प्रादेशिक प्रशासनाने सुरक्षित स्थळावर स्थलांतरित केले आहे. सर्व आपत्कालीन सेवा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या आहेत. पुरामुळे चीनमध्ये आतापर्यंत १६५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


हेही वाचा

दुबईच्या वाळवंटात महापूर! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात का पडला? वाचा कारण

चीनमधील या विध्वंसाचा सर्वात वाईट परिणाम ग्वांगडोंगमध्ये दिसून आला. तिथे ४ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सिंगापूरच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे ११ हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना सुरू आहेत. त्यात ६ जण जखमी झाले आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अतिवृष्टीमुळे गुआंगडोंगमधील नद्या आणि ओढ्यांवर बांधलेले अनेक पूल पूर्णपणे कोसळले. कारण नद्यांमधील पाण्याचा दाब खूप जास्त आहे.


चीनमध्ये हवामान आणखी खराब होऊ शकते

चीनच्या राष्ट्रीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिलच्या संध्याकाळी दक्षिण चीनच्या किनारी भागात वादळ आले. त्यामुळे चीनला या शतकातील सर्वांत मोठ्या पुराचा सामना करावा लागू शकतो. या वादळाबाबत हवामान खात्याने आधीच इशारा दिला होता. १२ कोटी लोकांना या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारेपर्यंत सागरी भागात जाण्यास सरकारने बंदी घातली आहे. दक्षिण चीनमधील मुख्य बेई नदीला तडाखा बसला आहे, जेथे निवासी भागात सोमवारी १९ फूट उंच पूर आला होता.


चिनी सैन्य बचावकार्यात मग्न

झओकिंग, शाओगुआन, किंगयुआन आणि जिआंगमेन या शहरांमध्ये वादळाचा प्रभाव आता दिसून येत आहे. या भागात गेल्या १२ तासांपासून पाऊस पडत आहे. झाओकिंग शहरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुढील आदेश येईपर्यंत तीन प्रांतात १ हजाराहून अधिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. झाओकिंगमध्ये इंटरनेट सेवा बंद झाली आहे. ग्वांगडोंग, किंगयुआन आणि शाओगुआनमध्ये मदतीसाठी चिनी सैन्य तैनात करण्यात आले आहे.