तैवानला रात्रभर भूकंपाचे झटके... ८० हून अधिक वेळा थरथरली जमीन!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 09:57 am
तैवानला रात्रभर भूकंपाचे झटके... ८० हून अधिक वेळा थरथरली जमीन!

हुआलियन : पूर्व तैवानमधील हुआलियन काउंटीमधील शौफेंग शहराला सोमवारी अवघ्या ९ मिनिटांत पाच जोरदार भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर रात्रभर जमीन थरथरत राहिली. एका रात्री या भागाला तब्बल ८० पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याची माहिती तेथील वृत्तसंस्थांनी दिली आहे.

भूकंपाची क्रिया काल सायंकाळी ५.०८ ते ५.१७ (स्थानिक वेळ) या दरम्यान सुरू झाली आणि रात्रभर सुरू राहिली. त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. काल संध्याकाळी ५ ते १२ या वेळेत तैवानच्या पूर्व किनारपट्टीवर ८० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले. यामध्ये सर्वाधिक ६.३ आणि ६ तीव्रतेची नोंद झाली. भारतीय वेळेनुसार, रात्री बाराच्या सुमारास काही मिनिटांच्या अंतराने दोन जोरदार भूकंपाचे धक्के बसले. तेव्हा तैवानमध्ये रात्रीचे २.२६ आणि २.३२ वाजले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्वेकडील हुआलियन प्रांतात जमिनीपासून ५.५ किलोमीटर खाली होता.

दोन इमारतींचे नुकसान

भूकंपामुळे हुआलियन भागात दोन इमारतींचे नुकसान झाले. यापैकी एक इमारत कोसळली असून दुसरी रस्त्याकडे झुकली आहे. तैवानसोबतच जपान, चीन आणि फिलिपाइन्समध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले. सध्या कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही.

काही दिवसांपूर्वी जोरदार भूकंपात झाला होता चौघांचा मृत्यू

दोन आठवड्यांपूर्वी, तैवानच्या पूर्व किनारपट्टीवर ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला होता. त्यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला होता आणि सातशेहून अधिक लोक जखमी झाले होते.