दोन्ही मतदारसंघांतून सोळा उमेदवार रिंगणात

आठ अपक्षांचा समावेश; ७ मे रोजी मतदान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 12:39 am
दोन्ही मतदारसंघांतून सोळा उमेदवार रिंगणात

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज वैध ठरलेल्या एकाही उमेदवाराने सोमवारी माघार घेतली नाही. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्हीही मतदारसंघांतून प्रत्येकी आठ असे एकूण सोळा उमेदवार रिंगणात राहिलेले आहेत. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी गोव्यात मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी उत्तर गोव्यातून १६ आणि दक्षिण गोव्यातून १७, असे एकूण ३३ उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे सादर झाले होते. काही उमेदवारांनी दोन, काहींनी तीन, तर भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी चार अर्ज सादर केले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक, काँग्रेसचे अॅड. रमाकांत खलप, आरजीपीचे मनोज परब, अखिल भारतीय परिवार पार्टीचे सखाराम नाईक, बसपाच्या मीलन वायंगणकर यांचे, तर शकील जमाल शेख, थॉमस फर्नांडिस व विशाल नाईक या तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.
दक्षिण गोव्यातून भाजपच्या पल्लवी धेंपो, काँग्रेसचे कॅ. विरियातो फर्नांडिस, आरजीपीचे रुबर्ट परेरा, बसपाच्या डॉ. श्वेता गावकर यांच्यासह दीपकुमार मापारी, हरिश्चंद्र नाईक, अॅलेक्सी फर्नांडिस व डॉ. कालिदास वायंगणकर या अपक्ष उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. परंतु, दिवसभरात एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने सोळा उमेदवार मैदानात असणार आहेत.
रिंगणातील उमेदवार व त्यांची चिन्हे
उत्तर गोवा
नाव                चिन्ह
श्रीपाद नाईक       कमळ
रमाकांत खलप       हात
मनोज परब           फुटबॉल
मीलन वायंगणकर      हत्ती
सखाराम नाईक      किटली
थॉमस फर्नांडिस      जेवणाने भरलेले ताट
विशाल नाईक       गॅस सिलिंडर
शकील शेख           हेल्मेट
...............................
दक्षिण गोवा
नाव                     चिन्ह
पल्लवी धेंपो                कमळ
विरियातो फर्नांडिस              हात
रुबर्ट परेरा                फुटबॉल
डॉ. श्वेता गावकर           हत्ती
दीपकुमार मापारी           सीसीटीव्ही कॅमेरा
हरिश्चंद्र नाईक            फुटबॉल खेळाडू
अॅलेक्सी फर्नांडिस            फणस
डॉ. कालिदास वायंगणकर     जहाज