बाहेरील मुलांना ‘नवोदय’मध्ये प्रवेशप्रकरणी सखोल चौकशी!

सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांची पालकांना ग्वाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd April, 12:36 am
बाहेरील मुलांना ‘नवोदय’मध्ये प्रवेशप्रकरणी सखोल चौकशी!

वाळपई : वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या ६ वी वर्गामध्ये खोटी कागदपत्रे तयार करून बिगरगोमंतकियाना चाचणी प्रवेश परीक्षा परवानगी देण्याची प्रक्रिया ही खरोखरच दुर्दैवी स्वरूपाची आहे. हा स्थानिक भागातील मुलावर अन्याय करणारा प्रकार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असण्याची शक्यता आहे. यामुळे पालकानी केलेल्या विनंतीनुसार या संदर्भाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायमोडकर यांनी दिले आहे .
वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी विद्यार्थ्यांचे पालक व विद्यालयाचे व्यवस्थापन या संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व सहकारी कर्मचाऱ्यांनी पालकांनी विचारलेल्या प्रश्नाला अनेकवेळा उडवाउडवीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकांनी या बैठकीमध्ये आक्रमक रूप धारण केल्यामुळे शेवटी उपजिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून या संदर्भाचा अहवाल पालकापर्यंत निश्चितच पोहोचविण्यात येईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले आहे.
या संदर्भात नवोदय विद्यालयाच्या व्यवस्थापनाला विचारले असता सर्वप्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पालक हा जबाबदार घटक नाही. आम्हाला ज्या अधिकाऱ्यांना या संदर्भाचा तपशील सादर करायचा असेल ते आम्ही सादर करू. मात्र पालकांना या संदर्भाची सविस्तरपणे माहिती देणार नसल्याची भूमिका विद्यालयाच्या प्राचार्य व संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतली. यानंतर उपस्थित पालक आक्रमक झाले. विद्यालय हे जनतेचे आहे. त्यासाठी सरकारचा पैसा खर्च करण्यात येत असतो. नवोदय विद्यालयामध्ये उत्तर गोव्यातील एकूण पाच तालुक्यातीलच मुलांना प्रवेश देण्याचा नियम आहे, असे असताना बिगरगोमंतिकांना कशाप्रकारे संधी देण्यात आली अशा प्रकारचा सवाल यावेळी आक्रमक पालकांनी केला व या संदर्भात सविस्तरपणे अहवाल देण्याची जोरदार मागणी केली. यावेळी भांबावलेल्या अवस्थेत प्राचार्यांनी उडवीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकांनी आपली भूमिका कायम ठेवली व आपल्या भूमिकेवर पालक ठाम राहिले.
यापूर्वी अनेक बिगरगोमंतकीयाना अशाच प्रकारे खोटी कागदपत्रे तयार करून प्रवेश दिला जाण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केलेली आहे. यात विद्यालयाचा एका कर्मचाऱ्याचा हात असण्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. सदर कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी पालकांनी केली आहे.
नवोदय विद्यालय समितीकडे करणार तक्रार
स्थानिक पातळीवर या संदर्भाची चौकशी न झाल्यास नवोदय विद्यालयाच्या समितीकडे या संदर्भात तक्रार करण्यात येणार असून त्यामध्ये गुंतलेल्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केलेले आहे. पालक सागर सावंत यांनी सांगितले की उपजिल्हाधिकारी या संदर्भात सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे. मात्र त्यासंदर्भात निष्काळजीपणा झाल्यास पालक अजिबात गप्प राहणार नाहीत असा इशारा दिलेला आहे. त्याचप्रमाणे माहिती हक्क कायद्याखाली या संदर्भाची कागदपत्रे प्राप्त करण्यात येणार असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यासाठी गरज पडल्यास केंद्रापर्यंत जाऊ अशा प्रकारची माहिती पालकांनी दिली आहे.