वीरभद्राचा थरार पाहण्यासाठी हजारो लोक लावणार उपस्थिती

चैत्रोत्सवाची होणार सांगता : ‘वीरभद्र’, रथ मिरवणूक आकर्षण

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
23rd April, 12:31 am
वीरभद्राचा थरार पाहण्यासाठी हजारो लोक लावणार उपस्थिती

साखळी : विठ्ठलापूर-साखळीतील श्री विठ्ठल रखुमाईच्या चैत्रोत्सवाची बुध. दि. २४ एप्रिल रोजी पहाटे होणाऱ्या वीरभद्र व रथ मिरवणुकीने सांगता होणार आहे. मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी शेवटचा दिवस असून ही रात्र सरून पहाटे मंदिराच्या बाजूच्या मंडपात या उत्सवातील खास आकर्षण असलेला ‘वीरभद्र’ साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा बुध. दि. २४ एप्रिल रोजीच्या पहाटे होणार आहे. त्यानंतर सकाळी श्रींची रथातून मिरवणूक काढल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.

गेल्या गुरुवार दि. १८ एप्रिल रोजी या चैत्रोत्सवाला प्रारंभ झाला होता. यावर्षी सहा दिवसांचा हा उत्सव असल्याने मंगळवार दि. २३ रोजी अखेरची रात्र आहे. या रात्री मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या खास मंडपात रात्री मामा मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळाकडून वीरभद्राचा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. त्यानंतर मंडपात वीरभद्राचा थरार रंगणार आहे.

अशी आहे, वीरभद्र परंपरा...

वाळवंटी नदीच्या किनारी असलेल्या पुंडलिक मंदिरात वीरभद्राची वेशभूषा व रंगभूषा केली जाते. ही रंगभूषा करत असताना त्या व्यक्तीला आरशात तोंड दाखविले जात नाही. वीरभद्राला पूर्णपणे रंगविण्यात आल्यानंतर पुंडलिक मंदिराकडून विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत येताना त्याची स्वतःची प्रतिमा दिसण्यासारख्या गोष्टी दूर केल्या जातात. वीरभद्राने आपले प्रतिरुप पाहिल्यास तो अधिकच आक्रमक होतो, असे मानले जाते.
विठ्ठल रखुमाई मंदिराजवळील विशेष अशा जागेवर ठेवण्यात आलेल्या एका बाकावर सर्वप्रथम हा वीरभद्र चढून सर्वांना प्रणाम करतो. बाकाच्या सभोवताली गवताचे रिंगण केले जाते व त्याला अग्नी देताच वीरभद्र खाली उडी मारून अग्नीच्या रिंगणात तलवारी नाचवत फेरी मारतो. नंतर तो मंडपात दाखल होतो. मंडपात तलवारी नाचवत टाळ व पखवाजाच्या ठेक्यावर वीरभद्र फेऱ्या मारायला सुरुवात करतो. या फेऱ्यांच्या संख्येला मर्यादा नसते.
या फेऱ्या मारत असतानाच त्याच्यावर दैवी अवसर येतो. त्याचवेळी अत्यंत सतर्कतेने त्याला सांभाळण्यासाठी त्याच्या भोवती फिरणारे लोक त्याला उचलून धरतात. त्याच्या हातातील तलवारी बाजूला करतात. तसेच त्याच्या पाठीला बांधण्यात आलेली प्रभावळ (भद्र) सोडवून बाजूला केली जाते. वीरभद्रावर दैवी अवसर असताना त्याची प्रभावळ असलेली पाठ जमिनीला टेकल्यास त्याला शंभर हातींचे बळ येते व तो अधिकच आक्रमक व धोकादायक बनतो, अशी धारणा आहे. म्हणून सर्वप्रथम त्याला जमिनीपासून वर उचलून घेतला जातो.
त्याला उचलूनच श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात नेले जाते. तरीही त्याचा अवसर निवळलेला नसतो. मंदिरात त्याच्या अंगावर तीर्थ शिंपडल्यावर व तीर्थ ग्रहण करायला दिल्यावर बऱ्याच वेळानंतर त्याचा अवसर निवळतो. त्यानंतर सकाळी विठ्ठल रखुमाई मंदिराच्या सभोवताली श्रींची रथातून मिरवणूक काढली जाते. त्यानंतर या चैत्रोत्सवाची सांगता होते. 

हेही वाचा