‘नवोदय’च्या प्राचार्यांना भेटण्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना मज्जाव!... गेटवरच अडवले

महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेस बसून दिल्याने शाळा व्यवस्थापन-पालकांत वाद

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th April, 02:46 pm
‘नवोदय’च्या प्राचार्यांना भेटण्यास विद्यार्थ्यांच्या पालकांना मज्जाव!... गेटवरच अडवले

वाळपई : येथील जवाहर नवोदय विद्यालयात महाराष्ट्रातील २५ मुलांना इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी चाचणीला बसवण्यात आल्यानंतर ते विद्यार्थी प्रवेश चाचणीत उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे उत्तर गोव्यातील मुलांवर अन्याय झालाचा आरोप करत पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी आज पालक प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी गेले असता, त्यांना मज्जाव करण्यात आला. या पालकांना गेटवरच आडवण्यात आले. यामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यातील वाद आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश चाचणी घेतली जाते. या विद्यालयात उत्तर गोव्यातील मुलांनाच प्रवेश देण्याचे बंधनकारक आहे. तरीही यावेळेस महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांना प्रवेश चाचणीत बसण्याची अनुमती देण्यात आली. यात ते विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता १८ एप्रिलपासून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील जे विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यांनी खोटा रहिवासी दाखला व इतर कागदपत्रे जोडली होती. हा उत्तर गोव्यातील मुलांवर अन्याय आहे, असा आरोप यावेळी पालकांनी केला आहे.

वरील प्रकरणी मामलेदारांकडे तक्रार केली असली तरी पुढे काहीच हालचाल होत नाही. यासाठी आज (ता. २०) याच विषयी जाब विचारण्यासाठी पालक विद्यालयात गेले होते. त्यांना प्राचार्यांना भेटून विचारणा करायची होती. मात्र, शाळा व्यवस्थापनाने पालकांना मज्जाव केला. त्यांना गेटवरच अडवून ठेवले. यामुळे पालक संतप्त बनले आहेत. त्यांनी लवकरच बैठक घेऊन पुढील पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. प्रसंगी केंद्रीय मंत्रालयापर्यंत जाण्याची तयारीही त्यांनी केली आहे.

* शाळा व्यवस्थापनाने बनवाबनवी करून स्थानिकांवर अन्याय केला. बेकायदेशीरपणे परराज्यातील मुलांना प्रवेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही खरोखरच दुर्दैवी बाब आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. - सागर सावंत, पालक

* प्राचार्यांना भेटायचे असल्यास पालकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. परवानगी न घेता शाळेच्या आवारात प्रवेश करणे नियमबाह्य आहे. तसा उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास पालक प्राचार्यांना भेटू शकतात. - शाळा व्यवस्थापन

हेही वाचा