पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयित मोहम्मद सुहैल याला अटक

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 05:09 pm
पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार;  संशयित मोहम्मद सुहैल याला अटक

म्हापसा : पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका १५ वर्षीय मुलीशी मैत्री करून व तिच्यावर मेरशी येथे नेऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मोहम्मद सुहैल (रा. मेरशी; मूळ उत्तर प्रदेश) याला अटक केली. पीडितेच्या वडिलांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार गुरुवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला.

संशयित आरोपी हा एका दुकानावर कामाला होता. तिथे त्याने पीडित मुलीशी मैत्री केली. गुरुवारी सकाळी संशयिताने पीडितेला फुस लावून आपल्यासोबत मेरशी येथे नेले. नंतर त्याने तिला आपल्या खोलीवर नेले व तिथे संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी घरी आली तेव्हा तिच्या आईवडिलांना हा प्रकार समजला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पर्वरी पोलिसांत संशयिताविरुद्ध अपहरण व लैंगिक अत्याचाराची रितसर तक्रार दाखल केली.

त्यानुसार, पोलिसांनी संशयित आरोपी मोहम्मद सुहैल याच्याविरुद्ध भा.दं.सं.चे कलम ३६३ व ३७६ तसेच गोवा बाल कायदा कलम ८(२) आणि पॉक्सो कायदा कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. नंतर पोलिसांनी संशयिताला पकडून रितसर अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लॉरेन सिक्वेरा करीत आहेत.

हेही वाचा