पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा जपानी नागरिकांवर हल्ला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19th April, 05:06 pm
पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा जपानी नागरिकांवर हल्ला

कराची : पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कराची येथे शुक्रवारी दहशतवाद्यांनी जपानी नागरिकांच्या वाहनाला लक्ष्य करून आत्मघाती हल्ला केला. सुदैवाने वाहनातून प्रवास करणारे जपानी नागरिक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. मात्र, आत्मघातकी हल्ला करणारा दहशतवादी ठार झाला.

कराचीचे पोलीस उपमहानिरीक्षक अझफर महेसर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी लांधी येथील मुर्तझा चौरंगीजवळ जपानी नागरिकांच्या व्हॅनला धडक देण्याचा प्रयत्न केला. जपानचे हे नागरिक पाकिस्तान सुझुकी मोटर्समध्ये काम करतात. पाचही जपानी नागरिक सुरक्षित आहेत, मात्र त्यांच्यासोबत असलेला खाजगी सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे.

एका दहशतवाद्याने स्वत:ला उडवले

दहशतवादविरोधी विभागाचे उपमहानिरीक्षक आसिफ एजाज शेख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जपानी नागरिक दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एका व्हॅनमधून प्रवास करत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या व्हॅनला धडक देण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले तर दुसऱ्याने व्हॅनजवळ जाताना स्वत:ला उडवले. पाचही जपानी नागरिक सुरक्षित आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतली नाही. जपानी नागरिकांचे वाहन बुलेट फ्रुट होते.

दहशतवाद्यांचे नापाक इरादे फसले

जिना हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण तीन जखमींना - दोन सुरक्षा कर्मचारी आणि एक प्रवासी वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. कोणत्याही परदेशी नागरिकाला रुग्णालयात आणण्यात आले नसल्याची पुष्टी रुग्णालयाने केली आहे.

जपानी नागरिक पाकिस्तान सुझुकी मोटर्समध्ये काम करायचे. सिंधचे वाहतूक मंत्री शर्जील इनाम मेमन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईने दहशतवाद्यांचे नापाक इरादे हाणून पाडले, असे त्यांनी म्हटले आहे. सिंधचे राज्यपाल कामरान टेसोरी यांनी आत्मघातकी हल्ल्याचा निषेध केला आणि घटनेचा अहवाल मागवला. शहरात दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा