हुबळीत काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या; आरोपीस अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19th April, 03:26 pm
हुबळीत काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या; आरोपीस अटक

हुबळी : येथील बी.व्ही.बी. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नेहा हिरेमठ (२१) या एमसीएच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. नेहा ही हुबळी धारवाड पालिकेचे काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची कन्या होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी फैयाज (२३) याला अटक केली आहे. खुनाचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला प्रपोज केले होते. मात्र, नेहाने त्याचा प्रस्ताव नाकारला होता. याचा आरोपीला राग आला आणि त्याने तिच्यावर चाकूने पाच-सहा वार केले. नेहा एमसीएच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. तर आरोपी फैयाज याने एमसीएचे शिक्षण अर्धवट सोडले होते. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काँग्रेसचे नगरसेवक तथा नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनीही प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. माझी मुलगी महाविद्यालयातून परतत असताना अज्ञात व्यक्तीने येऊन तिच्यावर चाकूने सात वार केले आणि तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. माझ्या मुलीने आरोपीचा प्रेमप्रस्ताव नाकारल्यामुळे तिची हत्या करण्यात आली. घटना घडण्यापूर्वी आरोपीशी आमचे बोलणे झाले होते. तेथे आम्ही त्याला समजावून सांगितले की, आम्ही तुला लग्न करण्यास परवानगी देऊ शकत नाही. त्यानंतर त्याने तिची हत्या केली, असे हिरेमठ यांनी म्हटले आहे.

आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीला तासाभरात पकडण्यात आले आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून आम्ही तपास करत आहोत. तपासादरम्यान सर्व काही समोर येईल, असे पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, नेहाच्या हत्येवरून कर्नाटकातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

हेही वाचा