मासळीवाहू ट्रकविरोधात तक्रार करणाऱ्यास मारहाण; तिघांची पोलीस कोठडीत रवानगी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 02:34 pm
मासळीवाहू ट्रकविरोधात तक्रार करणाऱ्यास मारहाण; तिघांची पोलीस कोठडीत रवानगी

मडगाव : मासळीवाहू ट्रकमधून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याचे पाहून समीर कृष्णा फळदेसाई यांनी तक्रारी केली होती. या विषयावरून संशयित सय्यद मोहम्मद रफीक, सय्यद ख्वाजा मैनुद्दीन (दाडीया, तळावली) व शेख मोहम्मद इब्राहिम (कालकोंडा, नावेली) यांनी समीरला मारहाण केली. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ट्रकमधून मासळीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सांडत असल्याची तक्रार केल्याप्रकरणी बाळ्ळी जंक्शनजवळ समीर कृष्णा फळदेसाई (४०, रा. वंटे-फातर्पा) यांच्याशी ट्रकचालकाने वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर कॉल करत आणखी काहीजणांना बोलावून घेतले होते. थोड्याच वेळात घटनास्थळी १८ ते २० लोक जमा झाले व त्यांनी तक्रारदार समीर फळदेसाई यांच्यावर दगडांनी मारहाण केली. स्थानिक व पोलिसांकडून मध्यस्ती करत फळदेसाई यांना बाजूला घेण्यात आले. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी संशयित सय्यद मोहम्मद रफीक, सय्यद ख्वाजा मैनुद्दीन (दाडीया तळावली) व शेख मोहम्मद इब्राहिम (कालकोंडा, नावेली) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे, लोकांच्या आरोग्याला धोका होईल, असे कृत्य करणे याप्रकरणी गुन्हा नोंद करत अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा