सावधान!.. गोव्याचा पारा ३६ अंशावर पोहोचण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 02:21 pm
सावधान!.. गोव्याचा पारा ३६ अंशावर पोहोचण्याची शक्यता

पणजी : गोव्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. गुरुवारी राज्यातील विविध भागांत कमाल ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील सात दिवसांत तापमान ३४ ते ३६ अंशा दरम्यानच राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच जाणवणारे तापमान म्हणजेच ‘हिट इंडेक्स’ ४० ते ५० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रखर उन्हात घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २१ एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण उष्ण आणि दमट असण्याची शक्यता आहे. मात्र, उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. गोव्यासारख्या किनारी प्रदेशात कमाल तापमान ३७ अंश किंवा त्यावर गेले तर उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले जाते. याशिवाय कमाल तापमान सामान्य कमाल तापमानापेक्षा ४.५ ते ६.४ अंशाने वाढले तरी देखील उष्णतेची लाट असे संबोधले जाते.

दाबोळी येथे आज कमाल ३४.६ अंश तर पणजीत ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पणजीतील सामान्य किमान तापमान २.३ अंश सेल्सिअसने वाढून २७.६ अंश सेल्सिअस झाले होते. आज आणि उद्या वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. मात्र, खात्याकडून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही. खात्याने राज्यात २२ ते २५ एप्रिल दरम्यान वातावरण कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा