श्रीपाद नाईक गत निवडणुकीत होते चार मतदारसंघांत पिछाडीवर!

उत्तरेतील अठरा आमदार भाजपकडे असल्याने जिंकण्याचा विश्वास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th April, 12:48 am
श्रीपाद नाईक गत निवडणुकीत होते चार मतदारसंघांत पिछाडीवर!

पण​जी : गेल्या पंचवीस वर्षांपासून उत्तर गोव्याचे खासदार असलेल्या केंद्रीय मंत्री तथा भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक गत लोकसभा निवडणुकीत कळंगुट, ताळगाव, सांताक्रूज​ आणि सांतआंद्रे या चार मतदारसंघांत पिछाडीवर होते. इतर सोळा मतदारसंघांत आघाडी घेत त्यांनी काँग्रेस उमेदवार गिरीश चोडणकर यांचा पराभव केला होता.
गत लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात भाजपचे श्रीपाद नाईक आणि काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांच्यात दुरंगी लढत झाली होती. श्रीपाद नाईक यांना २,४४,८४४, तर चोडणकर यांना १,६४,५९७ मते मिळाली होती. श्रीपाद नाईक यांनी चोडणकर यांचा ८०,२४७ मतांनी पराभव केलेला होता. यात उत्तर गोव्यातील वीसपैकी १६ मतदारसंघांमध्ये श्रीपाद नाईक यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. पण, कळंगुट, ताळगाव, सांताक्रूज​ आणि सांतआंद्रे या चार मतदारसंघांमध्ये मात्र त्यांच्या वाट्याला अपयश आलेले होते. गत लोकसभा निवडणुकीवेळी या चारपैकी कळंगुट वगळता इतर तीन मतदारसंघ काँग्रेसकडे होते.
अठरा आमदारांमुळेच लाखांचे स्वप्न
सद्यस्थितीत उत्तर गोव्यातील वीसपैकी एक मतदारसंघ काँग्रेसकडे आणि एक मतदारसंघ रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) पक्षाकडे आहे. तर, इतर अठरा मतदारसंघांत भाजप आणि मगो युतीचे आमदार आहेत. त्यामुळेच उत्तर गोव्यातून यावेळी श्रीपाद नाईक यांना एक लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे. पण, त्यात त्यांना किती यश मिळणार, हे ४ जून रोजी निकाला दिवशीच स्पष्ट होणार आहे.
तिसवाडी वगळता उत्तर गोव्यातील तालुक्यांमध्ये श्रीपाद भाऊंचे वर्चस्व
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यातील पाच तालुक्यांमध्ये भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचे वर्चस्व होते. तिसवाडीत फक्त श्रीपाद नाईक आणि काँग्रेस यांच्यातील लढत चुरशीची झाली. पण इतर तालुक्यांमध्ये नाईक यांनी मताधिक्य मिळवले आहे.
२०१९ मध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये दुहेरी लढत झाली होती. मात्र यावेळी रिव्होल्युशनरी​गोवन्स रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या तिरंगी लढतीत यावेळी भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचे भविष्य ठरणार आहे.
तिसवाडीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली. काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी या तालुक्यात १हजार मतांची आघाडी घेतली होती. एकूण ९१ हचार ८१३ पैकी गिरीश चोडणकर यांना एकूण मतदानापैकी ४४ हजार ७६८ मते मिळाली. तर श्रीपाद नाईक यांना ४३ हजार २७८ मते मिळाली. ताळगाव, सांताक्रूझ आणि सांतआंद्रे मतदारसंघात नाईक यांना कमी मते मिळाली होती. बार्देस तालुक्यात श्रीपाद नाईक यांना सर्वाधिक मते मिळाली तर सर्वांत कमी मते सत्तरी तालुक्यात मिळाली. बार्देस तालुक्यात एकूण १ लाख ४२ हजार ५६८ मतदार झाले होते. पैकी नाईक यांना ७४ हजार ८४ मते मिळाली होती. तर चोडणकर यांना ६० हजार १३१ मते मिळाली. फक्त कळंगुट मतदारसंघातच नाईक यांची कमी मतांची आघाडी होती. पर्ये मतदारसंघात एकूण ३९ हजार ५२६ पैकी नाईक यांना ३१ हजार ९१४ मते मिळाली. तर चोडणकर यांना १४ हजार ७१० मते मिळाली.
डिचोली तालुक्यात ६० हजार ६९६ मतांपैकी श्रीपाद नाईक यांना ४४ हजार २९९ मते पडली.
तर चोडणकर यांना २० हजार १९१ मते मिळाली. तर पेडणे तालुक्यात एकूण ५२ हजार ६५२ पैकी श्रीपाद नाईक यांना ३४ हजार ५१५ तर गिरीश यांना १४ हजार ८३१ मते मिळाली.
पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या उत्तरेतील राजकीय परिस्थिती बदलली आहे. नाईक यांची लढत काँग्रेस आणि आरजीपी सोबत आहे. सत्तरी व बार्देस तालुक्यात भाजपला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रुद्रेश्वर मंदिरात भंडारी समाजाच्या प्रकरणाचा परिणाम श्रीपाद नाईक यांच्या मतांवर होण्याची शक्यता आहे. ७ मे राेजी हे चित्र स्पष्ट होईल.
आरजीपीने मिळवली होती ४७,७३५ मते
- यावेळची उत्तर गोव्यातील लोकसभा निवडणूक भाजप, काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या तीन पक्षांमध्ये तिरंगी होत आहे.
- आरजीपीने गत २०२२ च्या विधानसभा निवडणुकांपासून राजकारणाची सुरुवात केली. पहिल्याच निवडणुकीत आरजीपीने उत्तर गोव्यातील वीसपैकी अठरा मतदारसंघांमध्ये उमेदवार उतरवलेले होते.
- या निवडणुकीत आरजीपीने उत्तर गोव्यातील ४७,७३५ मते मिळवली होती. तर काही मतदारसंघांत त्यांचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी राहिलेले होते.
- यावेळी उत्तर गोव्यातून पक्षाचे संस्थापक मनोज परब स्वत:च लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांचा फटका काँग्रेसला बसतो की भाजप-काँग्रेसच्या भांडणांत मनोज परब स्वत: बाजी मारतात, याचे उत्तर ४ जूनलाच मिळेल.            

हेही वाचा