काँग्रेसचे कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्याकडे पाच पदव्या, पदविका

पल्लवी, मनोज यांचे पदव्युत्तर शिक्षण : अॅड. खलप, श्रीपाद यांच्याकडे पदवी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th April, 12:45 am
काँग्रेसचे कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्याकडे पाच पदव्या, पदविका

पणजी : लोकसभ‍ा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि आरजीपीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी सर्व उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रताही प्रतिज्ञापत्रात सादर केली आहे. यामध्ये दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस हे हुशार ठरले आहेत. त्यांच्याकडे ५ पदव्या आणि पदविकांचे शिक्षण आहे. त्याचप्रमाणे द. गोव्यातील भाजप उमेदवार पल्लवी धेंपो आणि उत्तर गोव्यातील आरजीपीचे उमेदवार मनोज परब यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. उत्तर गोव्यातील भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार अनुक्रमे श्रीपाद नाईक आणि रमाकांत खलप यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर आरजीपीचे द. गोव्यातील उमेदवार रुबर्ट परेरा हे आयटीआय पदवीधर आहेत.
पल्लवी धेंपो पदव्युत्तर शिक्षित असून त्यांनी एमआयटी पुणे येथून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. श्रीपाद नाईक यांनी धेंपे महाविद्यालयातून बीएची पदवी प्राप्त केली आहे. तर रमाकांत खलप यांनी मुंबई विद्यापीठातून बी.एससी आणि धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातून एलएलबी पदवी घेतली आहे.
उत्तर गोव्यातील आरजीपीचे उमेदवार मनोज परब यांनी गोवा विद्यापीठातून एम.एससी जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तर दक्षिण गोव्यातील उमेदवार रुबर्ट परेरा यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर फर्मागुडी येथून आयटीआय केले.

कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी गोवा विद्यापीठातून बी.ई.ही पदवी पूर्ण केल्यानंतर लोणावळा येथील आयएनएस शिवाजी विद्यापीठातून सागरी अभियांत्रिकी स्पेशलायझेशन आणि नेव्हल इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमधून एअर इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन, ऑपरेशन्स आणि सप्लाय या दोन वेगळ्या विषयांत बिझनेस एॅडमिनीस्ट्रेशनमध्ये पदविका आणि साउथहॅम्पटन विद्यापीठातून कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट सर्टीफिकेट घेतले आहे. 

हेही वाचा