म्हापसा : वडाकडे, शिरसई येथे घराच्या पार्किंगस्थळी पार्क केलेली पल्सर मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.ही चोरीची घटना रविवार दि.14 रोजी घडली. या प्रकरणी दुचाकी मालक अक्षय यशवंत हरयाण (मूळ टिळकवाडी महाराष्ट्र) यांनी कोलवाळ पोलिसांत नोंदवली आहे
फिर्यादी अक्षय याने आपल्या भाड्याच्या घराच्या आवारातील पार्कींगस्थळी एमएच ०७ एएम १५६२ क्रमांकाची पल्सर मोटारसायकल नेहमीप्रमाणे १४ एप्रिल रोजी उत्तर रात्री १ च्या सुमारास पार्क केली होती. सकाळी १० वा. कामावर जाण्यासाठी ते गाडीजवळ आले तेव्हा तिथे दुचाकी नव्हती.त्यानंतर त्यांनी सिरसई रेल्वे स्थानकाजवळ गस्तीवर असलेल्या पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांच्या सल्ल्यानुसार हरयाण यांनी कोलवाळ पोलीस स्थानकात जाऊन दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दिली.
तसेच घरासमोरील सीसीटिव्ही फुटेजची त्यांनी पाहणी केली तेव्हा १४ एप्रिल रोजी उत्तर रात्री २ च्या सुमारास दोघे अज्ञात चोरटे तिथे येतात व त्यातील एकटा फिर्यादींची पल्सर दुचाकी चालू करून चोरून नेत असल्याचे दिसून आले.
हा चोरटा दुचाकी घेऊन थिवी म्हापसाच्या दिशेने गेला.चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत ८० हजार रूपये आहे. या प्रकरणी पुढील तपास कोलवाळ पोलीस करीत आहेत.