काणकोणात सहा महिन्यांत किडनी रुग्ण ९९ वरून ११४ वर

रुग्णांची वाढती संख्या धोक्याची घंटा : जनजागृतीसह आजारामागची कारणे शोधण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
काणकोणात सहा महिन्यांत किडनी रुग्ण ९९ वरून ११४ वर

पैंगीण : काणकोण येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) गेल्या सहा महिन्यांत मूत्रपिंडाच्या आजारामुळे सुमारे १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे काणकोणचे माजी नगरसेवक शुभम कोमरपंत आणि समाजकार्यकर्ते सुनय कोमरपंत यांनी म्हटले आहे. काणकोण तालुक्यात मूत्रपिंडाच्या आजारांचे तसेच डायलिसिस रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने जनजागृती मोहिमा राबविण्यासोबतच सीएचसीमध्ये नियमित नेफ्रोलॉजिस्टची नियुक्ती करून स्वतंत्र किडनी युनिट सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


काणकोण सीएचसीमधील डायलिसिस युनिटला भेट दिल्यानंतर कोमरपंत यांनी सांगितले की, अवघ्या सहा महिन्यांत डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ९९ वरून ११४ पर्यंत वाढली आहे. याशिवाय काणकोणमधील अनेक रुग्ण राज्यातील इतर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्येही डायलिसिस उपचार घेत आहेत.

सध्या काणकोणच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात ११४ रुग्ण नियमित डायलिसिस घेत असून त्यापैकी सुमारे ७० टक्के रुग्ण हे अनुसूचित जमाती (एसटी) समाजातील आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने गावडोंगरी, खोतिगाव, अर्वे, खोला यांसारख्या दुर्गम भागांतील असून उर्वरित रुग्ण किनारपट्टीवरील मच्छीमार समाजातील आहेत.

काणकोणमधील एपेक्स किडनी केअर सेंटर सध्या चार शिफ्टमध्ये कार्यरत आहे. यातील पहिल्या तीन शिफ्ट नेहमी पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात, तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे नुकतीच सुरू करण्यात आलेल्या चौथ्या शिफ्टमध्येही रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे, अशी माहिती तेथील डॉक्टरांनी दिली. बहुसंख्य किडनी रुग्ण हे वेळीप आणि पागी समाजातील असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, काणकोणमध्ये मूत्रपिंडाच्या आजारांचे प्रमाण इतके जास्त का आहे, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ड्युटीवरील डॉक्टरांच्या माहितीनुसार, काणकोण युनिटमध्ये सध्या १४ सुसज्ज डायलिसिस बेड कार्यरत आहेत. डायलिसिस उपचारामुळे रुग्णांचे आयुष्य वाढण्यास मदत होते, मात्र तो किडनी निकामी होण्यावरील कायमस्वरूपी इलाज नाही.

किडनी रुग्णांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र हवे!

- शुभम कोमरपंत म्हणाले की, किडनी रुग्णांसाठी एक स्वतंत्र सामुदायिक आरोग्य केंद्र स्थापन करावे. जेणेकरून डायलिसिस रुग्णांना कोणताही त्रास किंवा गैरसोय होणार नाही. सामुदायिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. जुझे तवारिस यांनी सांगितले की, सरकारकडे मागणी-प्रस्ताव सादर करण्यात आला आहे व तो लवकरच मंजूर होणार आहे.

- काणकोण येथील डायलिसिस रुग्णांच्या कुटुंबियांची तपासणी करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. मूत्रपिंड निकामी होण्याची ही प्रकरणे किनारपट्टीवर का आणि कशी वाढत आहेत याचा अभ्यास सरकारने करावा, कारण ७० टक्के डायलिसिस रुग्ण याच भागातून येतात, असे शुभम कोमरपंत यांनी सांगितले. 

हेही वाचा