मनी लाँडरिंग प्रकरणात नऊ जणांना समन्स

कोची : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या कन्या वीणा विजयन (Veena Vijayan) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग (Enforcement Directorate (ED) has issued a summons to Veena Vijayan) प्रकरणात समन्स बजावले आहे. शुक्रवारी कोची येथील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात वीणा विजयन यांच्यासह एकूण नऊ जणांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
सीएमआरएल-एक्झालॉजिक आर्थिक व्यवहार प्रकरणाशी संबंधित चौकशीत ईडीने अलीकडेच अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि आर्थिक नोंदींच्या आधारे आता संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी
या प्रकरणात वीणा विजयन यांच्या मालकीच्या ‘एक्झालॉजिक’ या आयटी कंपनी आणि कोचीन मिनरल्स अॅंड रुटीले लिमिटेड (Cochin Minerals and Rutile Limited ) (सीएमआरएल) यांच्यात झालेल्या कथित संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. विशेष न्यायालयाने अलीकडेच सीएमआरएलची महत्त्वाची कागदपत्रे ईडीला देण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे फसवणूक तपास कार्यालयाच्या (SFIO) अहवालातील नोंदी तपास यंत्रणेला उपलब्ध झाल्या आहेत.
आर्थिक, डिजिटल पुरावे हाती
ईडीकडून वीणा विजयन आणि सीएमआरएल यांच्यातील करार, आयकर नोंदी तसेच व्यवहारांशी संबंधित आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तपासादरम्यान यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि डिजिटल पुरावे गोळा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
१८ कोटी रकमेची २४२ बॅंक खाती गोठवली
अलीकडील छापेमारीनंतर ईडीने सुमारे १८ कोटी रुपयांची रक्कम असलेली २४२ बँक खाती गोठविली आहेत. यामध्ये वीणा विजयन यांच्याशी संबंधित एका खात्याचाही समावेश असून; त्यात सुमारे १.५ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
केरळच्या राजकारणात खळबळ
दरम्यान, या कारवाईमुळे केरळच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे. डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईविरोधात निदर्शने केली. राजकीय सूडबुद्धीने तपास केला जात असल्याचा आरोप केला आहे. काही ठिकाणी आंदोलन हिंसक झाल्याने पोलिसांनी सुमारे ३०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून; पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
चौकशी तपासासाठी महत्त्वाची
शुक्रवारी होणारी वीणा विजयन यांची चौकशी सीएमआरएल-एक्झालॉजिक व्यवहार प्रकरणातील तपासासाठी महत्त्वाची मानली जात असून, निधीच्या प्रवाहाबाबत आणि कथित व्यवहारांच्या स्वरूपाबाबत अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.