
पणजी : धारबांदोडा (Darbandora) येथील श्री धारेश्वरी मंदिर (Shri Dhareshwari Temple) परिसरात महाकाय वृक्ष अचानक कोसळल्याने वीजवाहिनीचे खांब आणि तारा रस्त्यावर पडल्या. या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून; नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
वृक्ष कोसळल्यानंतर रस्त्यावर अडथळा निर्माण झाला. वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती नाही.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कोसळलेला वृक्ष हटविण्याचे तसेच नुकसानग्रस्त वीजवाहिन्या आणि खांबांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर अडथळा दूर करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.