अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर २४ भारतीय खलाशांची नौदलाकडून सुटका

इराणशी संबंध असलेल्या ‘मारिवेक्स’ टँकरवर कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 hours ago
अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर २४ भारतीय खलाशांची नौदलाकडून सुटका

मस्कत : अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा सामना करावा लागलेल्या ‘मारिवेक्स’ (Marivex) या तेलवाहू जहाजावरील २४ भारतीय खलाशांची सोमवारी (८ जून) ओमानच्या आग्नेय किनाऱ्याजवळ नौदलाकडून सुरक्षित सुटका करण्यात आली. सर्व खलाशी सुरक्षित असून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरविण्यात येत आहे. ते पुढील दोन दिवसांत भारतात परतण्याची शक्यता आहे.

‘मारिवेक्स’ या टँकरवर अमेरिकेने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इराणशी संबंधित व्यवहारांमुळे निर्बंध (सॅंक्शन्स) लादले होते. या जहाजाने यापूर्वी इराणी तेल भारतात वाहून नेल्याचा आरोपही करण्यात आला होता.

अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने (United States Central Command) (सेंटकॉम)  दिलेल्या माहितीनुसार, संबंधित टँकरने इराणकडे जाण्याचा प्रयत्न करून सुरू असलेल्या नाकेबंदीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर ओमानच्या किनारपट्टीजवळ बचाव मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये जहाजावरील सर्व २४ भारतीय खलाशांना (24 Indian sailors rescued)  सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमुळे मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्री वाहतूक आणि भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

भारतीय दूतावास आणि संबंधित अधिकाऱ्यांनी खलाशांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले असून; त्यांच्या मायदेशी परतीची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा