पिस्तुलाचा शोध घेण्याचे पाेलिसांसमोर आव्हान

म्हापसा : गावसावाडा, म्हापसा येथील सॅम्युअल गार्विन दी ब्रागांझा या २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाची पोलीस अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्यामार्फत म्हापसा पोलीस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.सोमवारी पोलीस अधीक्षक कर्पे यांनी म्हापसा पोलीस स्थानकाला भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. तर सायंकाळी पर्वरी येथील उत्तर गोवा पोलीस मुख्यालयात काही अधिकाऱ्यांनी जाऊन आपली बाजू मांडली. तसेच पोलीस स्थानकातील घटनेच्या दिवशीची सीसीटीव्ही फुटेज आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तावेज अधीक्षक कर्पे यांनी ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, रस्त्याच्या कडेला कचरा टाकल्याच्या प्रकाराचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे झालेली बदनामी आणि म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने मानसिक तणावाखाली जाऊन सॅम्युअलने शुक्रवारी उत्तररात्री १२.३० वाजता स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
या घटनेनंतर मृताची आई जेनेव्हिव्ह ब्रागांझा यांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. संबंधित पोलीस अधिकारी आणि व्हिडिओ बनवणार्या व्यक्तीवर आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीत केली होती. त्यानुसार उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी या तपासाची जबाबदारी अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्याकडे सोपविली आहे.
एका अज्ञात व्यक्तीने सॅम्युअल सोबत कचरा टाकण्याच्या किरकोळ वादावरून व्हिडिओ बनवला व नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. ४ जून रोजी म्हापसा पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता थेट गुन्हा नोंदवला आणि सॅम्युअलसह आम्हा कुटुंबाला त्यादिवशी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत पोलीस स्थानकात बसवून ठेवले, असा दावा तिने या तक्रारीत केला आहे.
सॅम्युअलवर अंत्यसंंस्कार
सोमवारी सॅम्युअलचे पार्थिव दफनभूमीत दफन करण्यात आले. मात्र, या प्रकरणातील गूढ अधिक वाढले असून सॅम्युअलच्या डोळ्याचे हाड आत्महत्त्येपूर्वी कसे मोडले? आणि त्याने आत्महत्येसाठी वापरलेला देशी कट्टा (पिस्तूल) कुठून आणला होता? याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान आता म्हापसा पोलिसांसमोर उभे राहिले आहे.सोमवारी दुपारी कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी सेंट जेरॉम चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्यानंतर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.