खांडेपार येथील शाळेची संरक्षण भिंत कोसळली

शनिवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे घडली घटना.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
खांडेपार येथील शाळेची संरक्षण भिंत कोसळली

पणजी : गोव्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खांडेपार येथील गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या मातोश्री इंदिराबाई बाबूराव खांडेपारकर शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडल्याचे समजते. सुदैवाने रात्रीच्या वेळी ही भिंत कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी यामुळे शाळेच्या मैदानाचे आणि परिसराचे नुकसान झाले आहे.



या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले आहे. योग्य गटार व्यवस्था नसणे आणि पाण्याचा निचरा न होणे यामुळेच भिंत कमकुवत होऊन कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मे महिन्याची २४ तारीख उजाडली तरी पंचायतीने कोणतीही मान्सूनपूर्व कामे वेळेत सुरू केली नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे नागरिक म्हणाले. रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेजची साफसफाई न केल्यामुळे पाणी साचत आहे, तसेच अनेक वीज खांबही धोकादायक स्थितीत आले आहेत. पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वी सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ ड्रेनेज दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे .



हेही वाचा