उपअधीक्षकांच्या तत्परतेमुळे जखमींवर वेळेत उपचार

फोंडा : उसगाव-तिस्क येथील बगल रस्त्यावरील धोकादायक जंक्शनवर रविवारी सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही दुचाकींवरील एकूण तीन जण जखमी झाले. अपघाताच्या वेळी तिथून कुळेच्या दिशेने जाणारे फोंडाचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी तत्परता दाखवत जखमींना स्वतःच्या शासकीय वाहनातून रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीत काम करणारे अजय आयकर आणि त्यांची बहीण आरती आयकर (मूळ रा. रामनगर-कर्नाटक) हे दोघे दुचाकीने रामनगर येथे जात होते. ते उसगाव येथील धोकादायक जंक्शनवर पोहोचले असता, विरुद्ध दिशेने दुचाकीवरून येणारे प्रकाश हेलगट (मूळ रा. रामनगर, सध्या रा. तिस्क-उसगाव) यांच्या दुचाकीशी त्यांची जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहने रस्त्यावर कोसळल्याने तिघेही जण जखमी झाले. या मार्गावरून बाहेरील राज्यातील वाहनांची आणि स्थानिक गाड्यांची मोठी वर्दळ असते. जंक्शनवर चालकांचा ताळमेळ न बसल्याने तसेच योग्य दिशादर्शक आणि सूचना फलक नसल्यामुळे येथे सातत्याने अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
अपघातानंतर उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी जखमींना तातडीने पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. फोंडा पोलीस स्थानकाचे साहाय्यक उपनिरीक्षक रामदास गावस यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.