फादर बोलमॅक्स परेरा व्हेंटीलेटरवर

रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती; उपचार सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
फादर बोलमॅक्स परेरा व्हेंटीलेटरवर

पणजी : चिखली येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्चचे धर्मगुरू फादर बोलमॅक्स परेरा यांची प्रकृती अत्यंत खालावली असून, त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. चिखलीचे पंच रोमन वाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १० वाजेपर्यंत फादर यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत होती, त्यांनी सूप पिले होते तसेच तिथे उपस्थित तरुणांशी त्यांनी गप्पा देखील मारल्या. मात्र, रात्री साधारण १०:२० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Major Cardiac Arrest) आला. सध्या त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर (Life Support) ठेवण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी पॅरिश कौन्सिल आणि इतर असोसिएशनच्या सदस्यांसोबत कुळे येथे सहलीला जाण्यासाठी फादर बोलमॅक्स वास्को रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. तेथे अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते बेशुद्ध होऊन खाली पडत असताना जवळच असलेल्या युवकांनी त्यांना तत्परतेने सावरले.

त्यांना तातडीने वास्को येथील डॅफोडिल्स रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी गोमेकॉत हलवले गेले. तिथे त्यांचे ईसीजी, सीटीस्कॅन आणि एक्सरे या सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या. फादर बोलमॅक्स यांची पूर्वी बायपास सर्जरी झालेली असल्याने त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. मात्र,रात्री उशिरा त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, संपूर्ण गोव्यातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे.


हेही वाचा